Home अक्कलकुवा सिंगपूर (ता. अक्कलकुवा) येथे महिला दिन उत्साहात साजरा; ग्रामीण महिलांना स्वावलंबनाचा संदेश

सिंगपूर (ता. अक्कलकुवा) येथे महिला दिन उत्साहात साजरा; ग्रामीण महिलांना स्वावलंबनाचा संदेश

0
Women's Day celebrated with enthusiasm in Singpur (Tal. Akkalkuwa); Message of self-reliance to rural women

अक्कलकुवा तालुक्यातील सिंगपूर येथे जागतिक महिला दिनानिमित्त कृषी विज्ञान केंद्र, नंदुरबार व महिला आर्थिक विकास महामंडळ, नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांसाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. ग्रामीण महिलांमध्ये जागरूकता निर्माण करणे, महिला सक्षमीकरणाचा संदेश देणे तसेच शासकीय योजना, प्रक्रिया उद्योग आणि आर्थिक स्वावलंबनाबाबत मार्गदर्शन करणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता. परिसरातील महिलांनी मोठ्या संख्येने उत्स्फूर्त सहभाग नोंदवून कार्यक्रमाला विशेष रंगत आणली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. हेडगेवार सेवा समितीचे विश्वस्त यशपालभाई पटेल उपस्थित होते. प्रमुख अतिथी म्हणून रविंद्र मोरे (डीडीएम, नाबार्ड) व नंदकुमार पैठणकर (जिल्हा व्यवस्थापक, जिल्हा अग्रणी बँक, नंदुरबार) उपस्थित होते. तसेच विशेष अतिथी म्हणून दीपक पटेल (प्रकल्प संचालक, आत्मा नंदुरबार) व कांता गौरी बनकर (जिल्हा समन्वयक, महिला आर्थिक विकास महामंडळ, नंदुरबार) यांची उपस्थिती लाभली. कार्यक्रमास ग्रामसेवक वसावे तसेच शाळेचे मुख्याध्यापक भामरे सर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ. आरती देशमुख (विषय विशेष तज्ञ – गृह विज्ञान, कृषी विज्ञान केंद्र, नंदुरबार) यांनी केले. त्यांनी जागतिक महिला दिन २०२६ ची थीम, महिला सक्षमीकरणाचे महत्त्व तसेच ग्रामीण महिलांसाठी मूल्यवर्धित अन्नपदार्थ व प्रक्रिया उद्योगांच्या माध्यमातून उत्पन्नवाढीच्या संधी याविषयी सविस्तर माहिती दिली. महिलांनी आपल्या कौशल्याच्या आधारे लघुउद्योग उभारून आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी व्हावे, असा संदेश त्यांनी दिला.

नाबार्डचे डीडीएम रविंद्र मोरे यांनी महिलांना महिला दिनाच्या शुभेच्छा देत ग्रामीण भागात प्रक्रिया उद्योग सुरू करून उत्पन्नाचे नवे मार्ग निर्माण करण्याचे आवाहन केले. त्यांनी सोया टोफू या पौष्टिक पदार्थाविषयी माहिती देत त्याचे महत्त्व सांगितले तसेच उपस्थित महिलांना सोया टोफूचे वितरण केले.

जिल्हा अग्रणी बँकेचे जिल्हा व्यवस्थापक नंदकुमार पैठणकर यांनी महिलांसाठी बँकमार्फत उपलब्ध असलेल्या विविध बचत योजना, विमा योजना आणि आर्थिक सुविधांबाबत माहिती दिली. महिलांनी बचत व विमा यावर भर देऊन आर्थिक सुरक्षिततेकडे पावले टाकावीत, असे त्यांनी सांगितले.

आत्मा नंदुरबारचे प्रकल्प संचालक दीपक पटेल यांनी आत्मा अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या शेतकरी गट, महिला गट आणि अभ्यास सहली याबाबत माहिती देत महिलांनी शेती व शेतीपूरक उद्योगांमध्ये सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन केले.

महिला आर्थिक विकास महामंडळाच्या जिल्हा समन्वयक कांता गौरी बनकर यांनी बचत गटांचे महत्त्व, दूध संकलन व्यवसाय तसेच महिलांच्या आर्थिक उन्नतीमध्ये बचत गटांची भूमिका स्पष्ट केली. महिलांनी एकत्र येऊन बचत गटांच्या माध्यमातून उद्योग उभारून आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावे, असा सल्ला त्यांनी दिला.

कार्यक्रमादरम्यान महिलांसाठी मनोरंजनात्मक उपक्रम आणि खेळ देखील आयोजित करण्यात आले. विशेषतः संगीत खुर्ची यांसारख्या खेळांमध्ये महिलांनी उत्साहाने सहभाग घेतल्याने कार्यक्रमात आनंददायी वातावरण निर्माण झाले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चेतना सीएमआरसीच्या व्यवस्थापक सौ. ज्योती वळवी यांनी सुंदर पद्धतीने केले, तर शैलजा पाडवी यांनी आभार प्रदर्शन केले.

या कार्यक्रमातून महिलांना विविध शासकीय योजना, आर्थिक संधी, प्रक्रिया उद्योग आणि महिला सक्षमीकरणाबाबत महत्त्वपूर्ण माहिती मिळाली. ग्रामीण महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.

#WomenEmpowerment#MahilaDin#KrishiVigyanKendra