Home धडगाव युवा क्रांतीचे आंदोलन, तेलखेडी शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईसाठी ५ फेब्रुवारीला रस्ता रोको

युवा क्रांतीचे आंदोलन, तेलखेडी शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईसाठी ५ फेब्रुवारीला रस्ता रोको

0

(धडगाव) प्रशासकीय दिरंगाईचा निषेध म्हणून धडगाव तालुक्यातील तेलखेडी येथील शेतकऱ्यांच्या अतिवृष्टी नुकसान भरपाईच्या मागणीसाठी ५ फेब्रुवारी रोजी ‘रस्ता रोको’ आंदोलन करण्यात येणार आहे. युवा क्रांती नंदुरबार व ग्रामस्थ तेलखेडी यांच्या वतीने रोहजरीपाडा येथील धडगाव–शहादा मुख्य रस्त्यावर हे आंदोलन होणार असून, यासंदर्भात तहसीलदार अक्राणी यांना निवेदन देण्यात आले आहे.याबाबत निवेदनात म्हटले आहे की, युवा क्रांती नंदुरबार संघटनेने दिनांक ०५/०१/२०२६ रोजी दिलेल्या अधिकृत निवेदनानंतरही प्रशासनाकडून आजतागायत कोणतीही समाधानकारक कार्यवाही करण्यात आलेली नाही. ऑक्टोबर–नोव्हेंबर २०२५ दरम्यान झालेल्या अवकाळी पावसामुळे तेलखेडी गावातील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, पंचनामे होऊनही या गावाला जाणीवपूर्वक नुकसान भरपाईच्या बाधित क्षेत्र यादीतून वगळण्यात आले आहे, असा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणात उप कृषी अधिकारी विजय भलकारे यांची भूमिका संशयास्पद असून, कथित आर्थिक मागणीमुळेच तेलखेडी गावाला भरपाईपासून वंचित ठेवण्यात आल्याचा ठाम आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
           वारंवार पाठपुरावा करूनही प्रशासनाने दखल न घेतल्यामुळे लोकशाही मार्गाने संघर्ष करण्याशिवाय पर्याय उरलेला नसल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे प्रशासनानेच ग्रामस्थांना बेमुदत रस्ता रोको आंदोलनासाठी मजबूर केले असून, या आंदोलनामुळे निर्माण होणाऱ्या कोणत्याही परिस्थितीस व कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नास प्रशासन पूर्णपणे जबाबदार राहील, असा इशाराही देण्यात आला आहे.
तेलखेडी गावातील सर्व अवकाळी पीक पंचनाम्यांची तातडीने पुनर्तपासणी करण्यात यावी, त्रिस्तरीय समितीवर गुन्हे दाखल करून संपूर्ण कार्यपद्धतीची सखोल व निष्पक्ष चौकशी करण्यात यावी, इतर बाधित गावांना ज्या निकषांवर एकरी नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे तेच निकष तेलखेडी गावास लागू करून तातडीने भरपाई मंजूर करण्यात यावी, तसेच उप कृषी अधिकारी विजय भलकारे यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार व कर्तव्यात कसूर या अनुषंगाने स्वतंत्र चौकशी करून दोषी आढळल्यास कठोर प्रशासकीय व फौजदारी कारवाई करण्यात यावी, अशा प्रमुख मागण्या निवेदनातून करण्यात आल्या आहेत.
         या निवेदनावर प्रदेश कार्यकारिणी सदस्य मंगेश वळवी, तालुका प्रमुख लक्ष्मण पाडवी, तालुका संघटक रविंद्र वळवी, संपर्क प्रमुख बावा पावरा, जनसंपर्क प्रमुख अमिताभ वळवी, टेट्या पावरा, पोलीस पाटील माका पावरा, नांज्या पावरा, किसन वळवी, दिलवरसिंग पाडवी, मेरसिंग पावरा, ठुमला पावरा, वसा पावरा यांच्यासह अनेक ग्रामस्थांच्या सह्या आहेत.