Home नंदुरबार जिल्हा तोरणमाळ महोत्सव २०२६ : निसर्ग, संस्कृती आणि शाश्वत विकासाचा अविस्मरणीय उत्सव

तोरणमाळ महोत्सव २०२६ : निसर्ग, संस्कृती आणि शाश्वत विकासाचा अविस्मरणीय उत्सव

0
Toranmal Festival 2026: An unforgettable celebration of nature, culture and sustainable development

सातपुडा पर्वतरांगांमध्ये वसलेल्या निसर्गरम्य तोरणमाळ येथे तीन दिवसीय तोरणमाळ महोत्सव २०२६ उत्साहात आणि शिस्तबद्ध नियोजनातून यशस्वीपणे संपन्न झाला. तोरणमाळ पर्यटनस्थळाच्या सर्वांगीण विकासाला चालना देणे आणि आदिवासी समाजाच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेचे दर्शन घडविणे हा या महोत्सवामागील मुख्य उद्देश होता.

पर्यावरणपूरक उद्घाटन आणि सांस्कृतिक जल्लोष:

महोत्सवाचे उद्घाटन पारंपरिक आदिवासी ढोल-वाद्यांच्या निनादात झाले. लेझीम, स्वागत गीत, मान्यवरांचे मार्गदर्शन आणि माहितीपुस्तिकेचे प्रकाशन यानंतर सायंकाळी रंगलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांनी उपस्थितांची मनं जिंकली. जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांचे नृत्याविष्कार, विविध गटांचे कला सादरीकरण, भांगरापाणी होळी नृत्य, पावरा डान्स आणि वाद्य वादन यामुळे आदिवासी कलेचा वैभवशाली आविष्कार अनुभवायला मिळाला.

विशेष म्हणजे, स्टेज, पोडियम आणि सजावटीसाठी बांबू व नैसर्गिक वस्तूंचा वापर करून पर्यावरणपूरक संदेश देण्यात आला. महिला आर्थिक विकास महामंडळ, नंदुरबार व उमेद (MSRLM) यांच्या २२ स्टॉल्सनी लक्षणीय व्यवसाय करत स्थानिक महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाला चालना दिली.

साहसी पर्यटन आणि निसर्गसंपन्न उपक्रम:

दुसऱ्या दिवशी सकाळी मा. जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या उपस्थितीत ट्रेकिंगचे आयोजन करण्यात आले. कलाकारांनी ‘लाईव्ह नेचर पेंटिंग’ साकारत तोरणमाळच्या सौंदर्याला रंगांमध्ये बंदिस्त केले. सीताखाई येथे सुरू करण्यात आलेल्या झिपलाईन अॅडव्हेंचर प्रकल्पाने विशेष आकर्षण मिळवले – २५ ते ३० सेकंदांत दरी ओलांडण्याचा रोमांच पर्यटकांनी अनुभवला.

समारोप आणि कृतज्ञता:

तिसऱ्या दिवसाची सुरवात मधुर बासरी वादनाने केली. त्यानंतर महोत्सव यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतलेल्या सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. मा. आमदार श्री. आमश्या पाडवी, मा. जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी, मा. पोलीस अधीक्षक श्रवण दत्त, मा. उपविभागीय अधिकारी अनय नावंदर, तसेच विविध विभागांचे अधिकारी आणि कर्मचारी यांच्या समन्वयातून हा महोत्सव यशस्वी झाला.

जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय, वनविभाग, जिल्हा आरोग्य अधिकारी व जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालय, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, महावितरण, सार्वजनिक बांधकाम विभाग, बस स्थानक आगार आदी विभागांसोबत समन्वय साधून मा. जिल्हा नियोजन अधिकारी शशांक काळे यांनी कार्यक्रमाचे प्रभावी नियोजन केले

युवकांचा उत्स्फूर्त सहभाग:

या महोत्सवाच्या यशस्वी आयोजनात Tribal Academy, Nandurbar येथील विद्यार्थी-विद्यार्थिनींनी तीनही दिवस स्वयंसेवक म्हणून मोलाची भूमिका बजावली. पुरुष व महिला विद्यार्थ्यांनी शिस्त, व्यवस्थापन, पर्यटक मार्गदर्शन, स्वच्छता आणि विविध कार्यक्रमांच्या समन्वयात सक्रिय सहभाग घेतला. त्यांच्या योगदानाची दखल घेत तिसऱ्या दिवशी समारोप समारंभात त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. युवा शक्तीच्या सहभागामुळे महोत्सव अधिक सुयोजित आणि प्रेरणादायी ठरला.

तोरणमाळ महोत्सव शपथ:

महोत्सवादरम्यान ‘जल, जंगल, जमीन’ संरक्षण, प्लास्टिकमुक्त तोरणमाळ, स्थानिक कला-संस्कृती जतन, स्वच्छता आणि जबाबदार पर्यटन यासाठी सर्वांनी शपथ घेतली.

विकासाचे मॉडेल:

खडतर भौगोलिक परिस्थितीतही स्थानिक ग्रामस्थांच्या उत्साह आणि प्रशासनाच्या नियोजनातून हा महोत्सव यशस्वी ठरला. पर्यटनवृद्धीमुळे स्थानिक रोजगारनिर्मिती, स्थलांतर रोखणे आणि शाश्वत विकासाचे मॉडेल उभे करण्याचा जिल्हा प्रशासनाचा निर्धार यावेळी अधोरेखित झाला.

तोरणमाळ महोत्सव २०२६ हा केवळ उत्सव नसून – तो निसर्गसंवर्धन, सांस्कृतिक अभिमान आणि सर्वसमावेशक विकासाचा प्रेरणादायी अध्याय ठरला आहे.

#toranmal#collectorofficenandurbar#toranmalfestival