
यंदा पाऊस लांबणीवर पडल्याने आपत्ती नियंत्रणासोबतच पिण्याच्या पाण्याचे नियोजन करण्याची आवश्यकता आहे. नालेसफाई सोबतच होल्डींग पाँड, दरडप्रवण क्षेत्रात संरक्षण जाळी बसवणे, होर्डींग्जचे स्ट्रक्चरल ऑडीट करावे. एनडीआरएफच्या धर्तीवर मुंबई महापालिकेने आपत्ती प्रतिसाद दल तयार करावेत, असे निर्देश देतानाच प्रशासकीय यंत्रणांनी टीम म्हणून काम करून पावसाळ्यात मुंबईकरांना दिलासा देण्याचे काम करावे, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई आणि परिसरातील पावसाळापूर्व कामांच्या अनुषंगाने आयोजित आढावा बैठकीत सांगितले. दरम्यान, मुंबईतील २००० किमी पैकी १७०० किमी लांबीच्या रस्त्यांचे काँक्रीटीकरण पूर्ण झाले असून रस्ते आणि खड्डे दुरूस्तीचा ८० टक्के खर्च कमी झाल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.
बैठकीस मुंबईच्या महापौर रितु तावडे, उपमहापौर संजय घाडी, उपमुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव असीम गुप्ता, प्रधान सचिव नविन सोना, मुंबई महापालिका आयुक्त अश्विनी भिडे, मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त, रेल्वे, पोलिस, सिडको, म्हाडा, एमएमआरडीए, एसआरए, तटरक्षक दल, नौसेना, एनडीआरएफ, बेस्ट विभागाचे अधिकारी उपस्थित होते.












