(नंदुरबार) महसूल प्रशासन अधिक कार्यक्षम, पारदर्शक, नागरिकाभिमुख आणि तंत्रज्ञानस्नेही करण्यासाठी अधिकारी-कर्मचाऱ्यांचे सातत्यपूर्ण प्रशिक्षण अत्यावश्यक आहे. “ज्ञान वाटल्याने ते कधीच कमी होत नाही, उलट ते वाढतच जाते. त्यामुळे प्रत्येकाने सतत शिकत राहिले पाहिजे, वाचनाची सवय जोपासली पाहिजे आणि आपले ज्ञान इतरांपर्यंत पोहोचविले पाहिजे. जो शिकेल आणि वाचेल, तोच खऱ्या अर्थाने यशस्वी होईल,” असे प्रतिपादन अपर जिल्हाधिकारी धनंजय गोगटे यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालय, नंदुरबार यांच्या वतीने महसूल विभागातील सहाय्यक महसूल अधिकारी, महसूल सहाय्यक, ग्राम महसूल अधिकारी आणि मंडळ अधिकारी यांच्यासाठी आयोजित प्रशिक्षण कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. वीर बिरसा मुंडा सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला निवासी उपजिल्हाधिकारी आशा संघवी-गांगुर्डे, तहसीलदार पंकज पाटील, लेखाधिकारी संतोष पावले यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
अपर जिल्हाधिकारी श्री. गोगटे म्हणाले की, महसूल कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणाचा आढावा घेतला असता जिल्ह्यातील परिस्थिती समाधानकारक नसल्याचे लक्षात आले. नोकरीनंतरचे मूलभूत प्रशिक्षण केवळ 17 ते 18 कर्मचाऱ्यांनाच मिळाले होते, तर पदोन्नतीनंतरचे प्रशिक्षणही अवघ्या 12 ते 13 कर्मचाऱ्यांपुरते मर्यादित राहिले होते. विविध संवर्गातील एकूण 402 कर्मचारी जिल्ह्यात कार्यरत असूनही बहुसंख्य कर्मचाऱ्यांना आवश्यक प्रशिक्षण मिळाले नव्हते.
ते पुढे म्हणाले की, राज्य शासनाच्या प्रशिक्षण धोरणाची आखणी करण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या समितीवर काम करण्याची संधी मिळाली. मात्र, राज्यासाठी प्रशिक्षण धोरण तयार करत असताना आपल्या जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांची प्रशिक्षणाची अवस्था समाधानकारक नसल्याचे जाणवले. त्यामुळे प्रशिक्षणाची सुरुवात नंदुरबार जिल्ह्यापासूनच करण्याचा निर्णय घेण्यात आला. या उपक्रमासाठी जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्वतः अभ्यास करून सादरीकरणे तयार केली, विषयांचा सखोल अभ्यास केला आणि प्रशिक्षक म्हणून जबाबदारी स्वीकारली. “आम्ही व्यावसायिक प्रशिक्षक नसू; पण प्रशिक्षणाच्या गुणवत्तेत कुठेही कमी पडू दिले नाही. कर्मचाऱ्यांनीही या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून त्याचे सकारात्मक परिणाम त्यांच्या कामकाजात निश्चितपणे दिसून येतील,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
प्रत्येक कर्मचाऱ्याने बदलत्या काळानुसार स्वतःला अद्ययावत ठेवले पाहिजे, प्रत्येक विषयाचे सखोल ज्ञान आत्मसात केले पाहिजे आणि सातत्याने अभ्यास करण्याची वृत्ती जोपासली पाहिजे, असे आवाहनही त्यांनी केले.
प्रत्येक विषयाचे सखोल ज्ञान आवश्यक : आशा संघवी
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी आशा संघवी-गांगुर्डे म्हणाल्या की, महसूल विभागाच्या दैनंदिन कामकाजासाठी आवश्यक असलेल्या विषयांवर आधारित हे प्रशिक्षण अत्यंत उपयुक्त ठरले आहे. अपर जिल्हाधिकारी धनंजय गोगटे यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या या उपक्रमामुळे अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या कामकाजात निश्चितच सकारात्मक बदल घडून येईल. प्रत्येक कर्मचाऱ्याने प्रत्येक विषयाचे सखोल ज्ञान आत्मसात करावे, हा या प्रशिक्षणामागील मुख्य उद्देश असून यानंतर मंडळ अधिकाऱ्यांसाठीही विशेष प्रशिक्षण आयोजित करण्यात येणार आहे. शासनाचे विविध धोरणात्मक निर्णय, बदललेले कायदे आणि त्यांची प्रभावी अंमलबजावणी यावर त्यामध्ये अधिक सविस्तर मार्गदर्शन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
महसूल प्रशासन अधिक प्रभावी, पारदर्शक, नागरिकाभिमुख आणि तंत्रज्ञानस्नेही करण्याच्या उद्देशाने जिल्हाधिकारी कार्यालय, नंदुरबार यांच्या वतीने जानेवारी ते जुलै 2026 या कालावधीत संस्थानिहाय प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात आला. जवळपास सहा महिने चाललेल्या या उपक्रमात 9 प्रशिक्षण सत्रांद्वारे एकूण 402 अधिकारी-कर्मचाऱ्यांना महसूल विषयक कायदे, कार्यालयीन कार्यपद्धती, डिजिटल प्रशासन आणि कृत्रिम बुद्धिमत्ता साधनांच्या वापराबाबत सखोल प्रशिक्षण देण्यात आले.
402 प्रशिक्षणार्थी
या प्रशिक्षणामध्ये 77 सहाय्यक महसूल अधिकारी, 94 महसूल सहाय्यक, 199 ग्राम महसूल अधिकारी आणि 32 मंडळ अधिकारी सहभागी झाले.
त्यात पहिल्या, चौथ्या, पाचव्या, सहाव्या व सातव्या सत्रात प्रत्येकी 50, दुसऱ्या व तिसऱ्या सत्रात प्रत्येकी 30, आठव्या सत्रात 43 आणि नवव्या सत्रात 49 प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण देण्यात आले.
या विषयांवर झाले प्रशिक्षण
प्रशिक्षणात मामलतदार न्यायालय अधिनियम, महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, विविध जमीनविषयक कायदे, महसूल अधिकाऱ्यांची कर्तव्ये व जबाबदाऱ्या, न्यायालयीन प्रकरणे, दावा, अपील, पुनर्विलोकन, जमाबंदी, जमीन महसूल वसुली, निवडणूक प्रक्रिया, माहितीचा अधिकार अधिनियम, सेवा हमी कायदा, राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा, गाव नमुने, फेरफार प्रक्रिया, वारसनोंदी, दुरुस्ती प्रकरणे, संजय गांधी योजना, विविध सहाय्य योजना, कुळवहिवाट, वतन, गायरान, शासकीय व आदिवासी जमिनी, विविध पंचनामे, गौण खनिज नियम, कार्यालयीन लेखा व वित्तीय अधिकार नियम, ई-कार्यालय, संगणकीय कार्यालयीन कौशल्ये, विविध ऑनलाइन प्रणाली तसेच कृत्रिम बुद्धिमत्ता साधनांचा वापर या विषयांवर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. प्रशिक्षण अधिक परिणामकारक होण्यासाठी परिचय व संवाद सत्राचेही आयोजन करण्यात आले.
यांनी दिले प्रशिक्षण
या प्रशिक्षणासाठी अपर जिल्हाधिकारी धनंजय गोगटे, उपजिल्हाधिकारी (प्रशासन) प्रमोद भामरे, जिल्हा पुनर्वसन अधिकारी नामदेव पाटील, उपजिल्हा निवडणूक अधिकारी कल्पना ठुबे, जिल्हा पुरवठा अधिकारी कैलास पवार, निवासी उपजिल्हाधिकारी आशा संघवी, उपजिल्हाधिकारी (रोहयो) उषाराणी देवगुणे, उपजिल्हाधिकारी श्याम वाडकर, तहसीलदार पंकज लोखंडे, तहसीलदार (पुनर्वसन) पंकज पाटील, तहसीलदार संतोष डेरे, जिल्हा खनिकर्म अधिकारी रोहिणी चव्हाण, लेखाधिकारी संतोष पावले, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे अधिकारी, जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी, मंडळ अधिकारी बबीराम चाटे, जयेश खैरनार तसेच माजी मुख्यमंत्री फेलो शण्मुख सोनवणे यांनी विविध विषयांवर मार्गदर्शन केले.
प्रशिक्षणाचे नियोजन सहाय्यक महसूल अधिकारी महेंद्र कदमबांडे, मंडळ अधिकारी अस्मिता सुर्यवंशी, महसूल सहाय्यक सागर आव्हाड आणि ग्राम महसूल अधिकारी किरण सूर्यवंशी यांनी केले.
या प्रशिक्षणामुळे महसूल विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांचे कायदेशीर, प्रशासकीय आणि तांत्रिक ज्ञान अधिक सक्षम होणार असून नागरिकांना अधिक जलद, पारदर्शक, उत्तरदायी आणि गुणवत्तापूर्ण सेवा उपलब्ध करून देण्यास निश्चितच बळ मिळणार असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
















