Home शेती शेतकऱ्यांनी आधुनिक शेतीसोबत कृषी पूरक व्यवसाय करावेत

शेतकऱ्यांनी आधुनिक शेतीसोबत कृषी पूरक व्यवसाय करावेत

0
Farmers should engage in agriculture-allied businesses alongside modern farming.

वर्धा : एकापेक्षा अधिक पिके घेता यावी यासाठी शेतकऱ्यांनी सिंचन सुविधा वाढविण्यावर भर द्यावा. कृषी, पशुसंवर्धन विभाग व इतर संस्थांच्या मदतीने शेतीसोबतच कुक्कुटपालन, शेळीपालन, दुग्धव्यवसाय यासारखे पूरक व्यवसाय आत्मसात करावेत. कृषि विज्ञान केंद्राच्या मार्गदर्शनाखाली नाविन्यपूर्ण पिके घ्यावीत, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी वान्मथी सी यांनी केले.

हरितक्रांतीचे जनक माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त साजरा होणारा कृषी दिन कृषि विज्ञान केंद्र, बायफ संस्था व नयारा एनर्जीच्या संयुक्त विद्यमाने निमगाव (सबाने) येथे साजरा करण्यात आला, त्यावेळी जिल्हाधिकारी बोलत होत्या. यावेळी विभागीय कृषी सहसंचालक उमेश घाडगे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अरविंद उपरीकर, कृषि विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ.जीवन कतोरे, नायराचे डेपो प्रमुख संजय अग्रवाल, बायफचे मुख्य कार्यक्रम व्यवस्थापक शैलेश भगत, नाबार्डचे सुशांत पाटील आदी उपस्थित होते.

विभागीय कृषी सहसंचालक उमेश घाडगे यांनी सांगितले की, शेतकऱ्यांनी पावसाचे पाणी शेतात मुरवण्यासाठी प्रयत्न करावेत. सरी-वरंबा व बीबीएफ पद्धतीने पिकांची लागवड केल्यास पाणी जमिनीत मुरण्यास मदत होते. डॉ.जीवन कतोरे यांनी यंदाच्या अल-निनो परिस्थितीत पिके वाचवण्यासाठी रुंद वरंबा सरी पद्धत, प्रत्येक तीन ओळींनंतर खोल डवरणी व रायझोबियम बीज प्रक्रिया करून नैसर्गिक युरिया निर्मितीचे महत्त्व सांगितले. अरविंद उपरीकर यांनी कीटकनाशक फवारणीवेळी घ्यावयाची काळजी व सेफ्टी किटचा वापर प्रात्यक्षिकासह समजावून सांगितला.

यावेळी डॉ.निलेश वझीरे यांनी सोयाबीन, तूर, कपाशीवरील किड-रोग नियंत्रणाची माहिती दिली. डॉ.भारती तिजारे यांनी तण नियंत्रण व खत नियोजनातून उत्पादन वाढीचे उपाय, डॉ.सविता पवार यांनी ड्रोन फवारणी तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिक दाखवले. डॉ.सचिन मुळे यांनी शेतीला जोडधंदा म्हणून कुक्कुटपालन, शेळीपालन व दुग्धव्यवसाय यांचे मार्गदर्शन केले. बायफचे वरिष्ठ प्रकल्प अधिकारी संजय बाभुळकर यांनी बायफ संस्थेच्या 75 गावांमधील कृषी व दुग्धव्यवसाय उपक्रमांमुळे शेतकऱ्यांना झालेल्या फायद्याची माहिती दिली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संजय बाभुळकर, अस्मिता भांदालकर, डॉ. विक्रम भैये, चंदु वाघाडे यांनी परिश्रम घेतले.