Home नंदुरबार जिल्हा नंदुरबारमध्ये ‘अमृत संवाद सेतू’ उपक्रम उत्साहात संपन्न;विद्यार्थी आणि प्रशासनात घडला विश्वासाचा संवाद!

नंदुरबारमध्ये ‘अमृत संवाद सेतू’ उपक्रम उत्साहात संपन्न;विद्यार्थी आणि प्रशासनात घडला विश्वासाचा संवाद!

1
'Amrut Samvad Setu' initiative concludes enthusiastically in Nandurbar; a dialogue of trust established between students and the administration!

(नंदुरबार) महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) या महाराष्ट्र शासनाच्या स्वायत्त संस्थेच्या वतीने राज्यभरात राबविण्यात येत असलेल्या ‘अमृत संवाद सेतू’ या अभिनव उपक्रमांतर्गत नंदुरबार येथील तहसील कार्यालयात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांना प्रशासनाची कार्यपद्धती प्रत्यक्ष समजावी, नागरिकांमध्ये सुजाण नागरिकत्वाची भावना निर्माण व्हावी आणि विद्यार्थी व प्रशासन यांच्यातील विश्वासाचे नाते अधिक दृढ व्हावे, या मुख्य उद्देशाने हा उपक्रम पार पडला, असल्याची माहिती महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनीचे जिल्हा व्यवस्थापक योगेश अहिरे यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

यावेळी नंदुरबारचे तहसीलदार प्रदीपकुमार पवार यांनी उपस्थित विद्यार्थ्यांशी सविस्तर संवाद साधला. त्यांनी तहसील कार्यालयातील विविध विभाग, महसूल प्रशासनाचे कामकाज, नागरिकांचे अधिकार व कर्तव्ये तसेच प्रशासकीय सेवांविषयी सविस्तर माहिती दिली. विद्यार्थ्यांनी विचारलेल्या विविध शंकांचे तहसीलदार पवार यांनी थेट व सोप्या भाषेत निरसन केले.

‘अमृत संवाद सेतू’च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना केवळ शासकीय कार्यालयांची माहितीच मिळाली नाही, तर त्यांच्यात नेतृत्वगुण, सामाजिक जबाबदारी, संविधानिक मूल्यांची जाणीव आणि लोकशाही प्रक्रियेविषयी सकारात्मक दृष्टिकोन विकसित होण्यास मदत होणार आहे. प्रशासनातील पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि नागरिकांना दिल्या जाणाऱ्या सेवांविषयी प्रत्यक्ष अनुभव मिळाल्याने भविष्यात सुजाण, जबाबदार आणि राष्ट्रहिताची जाणीव असणारी नवीन पिढी घडेल, असा विश्वास ‘अमृत’ संस्थेने व्यक्त केला आहे.

या उपक्रमात नंदुरबार शहरातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI) आणि दुर्गाबाई रघुवंशी विद्यालय येथील विद्यार्थी, विद्यार्थिनी तसेच प्राध्यापक वर्ग मोठ्या संख्येने सहभागी झाला होता. शासकीय यंत्रणा जवळून अनुभवण्याची आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांशी थेट संवाद साधण्याची संधी मिळाल्याबद्दल विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त केला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक अमृतचे जिल्हा व्यवस्थापक योगेश अहिरे यांनी केले, तर आभार प्रदर्शन दिनेश पाठक यांनी मानले.