(नंदुरबार) ता. अक्कलकुवा येथील मोलगी (मालपाडा) परिसरातील अमोप शेतकरी उत्पादक कंपनी (FPC) संचलित मिलेट प्रक्रिया युनिटला मा. जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी भेट देऊन तेथील कामकाजाची सविस्तर पाहणी केली. यावेळी त्यांनी युनिटमधील विविध प्रक्रिया, उपलब्ध सुविधा तसेच शेतकरी उत्पादक कंपनीच्या विविध उपक्रमांची माहिती जाणून घेतली.
या मिलेट प्रक्रिया युनिटमुळे स्थानिक शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनांचे मूल्यवर्धन करून अधिक चांगला बाजारभाव मिळण्यास मदत होणार आहे.
हैदराबाद येथील भारतीय मिलेट संशोधन संस्था (IIMR) कडून प्राप्त झालेल्या सेकंडरी मिलेट प्रोसेसिंग युनिटमुळे मिलेट उत्पादनांच्या प्रक्रियेस गती मिळणार असून त्यातून बाजारपेठेत स्पर्धात्मक आणि गुणवत्तापूर्ण उत्पादने उपलब्ध होणार आहेत.
या प्रकल्पाच्या माध्यमातून स्थानिक स्तरावर रोजगारनिर्मितीला चालना मिळणार असून ग्रामीण अर्थव्यवस्था बळकट होण्यास मदत होईल. तसेच शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीसाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

मा. जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी कृषी विभाग, आत्मा (ATMA) आणि कृषी विज्ञान केंद्र यांच्या संयुक्त प्रयत्नांचे कौतुक करत मिलेट मूल्यवर्धन, प्रक्रिया आणि प्रभावी विपणनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अधिक आर्थिक लाभ मिळवून देण्यासाठी अशा प्रकल्पांची आवश्यकता अधोरेखित केली.
स्थानिक संसाधनांचा प्रभावी वापर, आधुनिक तंत्रज्ञानाची जोड आणि शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील शाश्वत विकासाला चालना देण्याच्या दृष्टीने हा उपक्रम प्रेरणादायी ठरत आहे.
#Nandurbar#Millets#MilletMission#FarmerProducerCompany#Akkalkuwa#MilletProcessingUnit#DrMittaliSethi#DistrictCollectorNandurbar#AgricultureDevelopment#ATMA#KVK#VocalForLocal#MilletValueAddition#ShreeAnna#TribalDevelopment#NandurbarDistrict
















