
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र कॅन्सर केअर, रिसर्च अँड एज्युकेशन फाऊंडेशन कंपनी संचालक मंडळाची पहिली बैठक सह्याद्री अतिथीगृह येथे पार पडली.
आधुनिक तंत्रज्ञान, आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि राज्यशासित एल-२ व एल-३ कर्करोग रुग्णालयांच्या माध्यमातून महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील प्रत्येक व्यक्तीला निदानापासून उपचारापर्यंत समान व जागतिक दर्जाची कर्करोग सेवा उपलब्ध करून देण्यासाठी महाकेअर कंपनीची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. त्या माध्यमातून राज्यातील कर्करुग्णांची संख्या कमी करण्यात येणार आहे. त्यामुळे महाकेअरसाठी मनुष्यबळ उभारताना उच्च दर्जाची क्षमता असलेले मनुष्यबळ घ्यावे, असे निर्देशही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिले.
यावेळी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर, वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ, अपर मुख्य सचिव (वित्त) ओ. पी. गुप्ता, सचिव विकासचंद्र रस्तोगी, सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव निपुण विनायक, वैद्यकीय शिक्षण सचिव धीरज कुमार, आरोग्य आयुक्त संजय काटकर, वैद्यकीय शिक्षण आयुक्त अनिल भंडारी, महाराष्ट्र कॅन्सर केअर, रिसर्च अँड एज्युकेशन फाऊंडेशन कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अजय चंदनवाले, मानद सल्लागार व सदस्य डॉ. कैलाश शर्मा, नवीन खत्री, उपसचिव तथा सदस्य संदीप ढाकणे आदी उपस्थित होते.
महाकेअरची व्याप्ती…
महाकेअर कंपनीमार्फत विकेंद्रित सेवा प्रणालीद्वारे कर्करोग उपचार पद्धतीत परिवर्तन होणार आहे.
याअंतर्गत : टाटा मेमोरियल हॉस्पिटल येथे सर्वोच्च संशोधन व कर्करोग उपचार केंद्र.
मुंबई, पुणे, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, नांदेड, कोल्हापूर, चंद्रपूर, नाशिक व अमरावती येथे जिल्हास्तरीय सर्वसमावेशक कर्करोग उपचार केंद्रे.
मुंबई (कामा आणि आल्ब्लेस), रत्नागिरी, सातारा, बारामती, जळगाव, यवतमाळ, अंबाजोगाई (बीड), ठाणे व शिर्डी येथे निदान व डे-केअर केंद्रांची उभारणी.
महाआरोग्य प्रकल्पाच्या माध्यमातून राज्यव्यापी अंमलबजावणी.















