तंत्रज्ञानाच्या मदतीने सातपुड्याच्या दुर्गम वनक्षेत्रात सीडबॉलचा प्रसार!

(नंदुरबार) सातपुडा पर्वतरांगांमधील दुर्गम व अवनत वनक्षेत्राच्या पुनर्वैभवासाठी मेवासी वनविभाग, तळोदा वनपरिक्षेत्रांतर्गत शासकीय आश्रमशाळा, अमोनी येथे ड्रोनद्वारे सीडबॉल (बीजगोळे) प्रसाराचा भव्य शुभारंभ करण्यात आला.
तंत्रज्ञानाच्या मदतीने सातपुड्याच्या दुर्गम वनक्षेत्रात सीडबॉलचा प्रसार!
Spreading Seed Balls in Remote Satpura Forests Using Technology!

महाराष्ट्रात प्रथमच शास्त्रोक्त पद्धतीने तंत्रज्ञानाचा वापर करून उंच डोंगरावरील दुर्गम वनक्षेत्रात ७ लाखांहून अधिक सीडबॉल्सचा प्रसारकरण्यात येणार आहे. या उपक्रमाचा उद्देश सातपुडा पर्वतरांगांना पुन्हा हरित वैभव प्राप्त करून देणे हा आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार राजेशदादा पाडवी तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. 🌿
वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी सीडबॉल तयार करण्याचे प्रात्यक्षिक दाखविले. यावेळी आमदार राजेशदादा पाडवी व जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी विद्यार्थ्यांसमवेत सीडबॉल तयार करून उपक्रमाची माहिती जाणून घेतली. त्यानंतर प्रत्यक्ष ड्रोनद्वारे दुर्गम वनक्षेत्रात सीडबॉल्सचा प्रसार करण्यात आला.
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी तंत्रज्ञानाच्या साहाय्याने आव्हानात्मक कामे अधिक प्रभावी व सुलभ पद्धतीने पूर्ण होत असल्याचे सांगत वनविभागाच्या अभिनव उपक्रमाचे कौतुक केले.आमदार राजेशदादा पाडवी यांनी सातपुड्याला पुनर्वैभव प्राप्त करून देणाऱ्या या उपक्रमास शुभेच्छा दिल्या.
या उपक्रमास सहाय्यक वनसंरक्षक अमोल आडे, वनविभागाचे अधिकारी-कर्मचारी, शासकीय आश्रमशाळेचे मुख्याध्यापक, अधीक्षक, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, वनहक्क समितीचे पदाधिकारी, सरपंच व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जाहिरात
Dev-Mogra-Nandurbar-Ad-300x250
Follow Us: