शिक्षणाच्या बळावरच भटक्या विमुक्त समाजाचा विकास शक्य; नंदुरबारमध्ये ‘विमुक्त दिन’ उत्साहात साजरा, गुणवंतांचा गौरव!

नंदुरबार:भटक्या-विमुक्त समाजासमोरील अनंत अडचणी, शासकीय कल्याणकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी आणि बदलत्या काळात शिक्षणाचे असलेले अनन्यसाधारण महत्त्व यांवर प्रकाश टाकण्यासाठी नंदुरबारमध्ये 'भटके विमुक्त दिन' मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या महत्त्वपूर्ण दिनाचे औचित्य साधून समाजातील तरुण पिढीने आणि विद्यार्थ्यांनी शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात सामील होऊन स्वतःची आणि समाजाची प्रगती साधावी, असे आग्रही आवाहन मान्यवरांनी केले.
शिक्षणाच्या बळावरच भटक्या विमुक्त समाजाचा विकास शक्य; नंदुरबारमध्ये ‘विमुक्त दिन’ उत्साहात साजरा, गुणवंतांचा गौरव!
Development of Nomadic and De-notified Tribes is possible only through education; 'Vimukta Din' celebrated with enthusiasm in Nandurbar, meritorious individuals felicitated!

नंदुरबार येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनात सहाय्यक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण कार्यालय, नंदुरबार यांच्या वतीने या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
विकासाच्या संधींचा लाभ घेण्याचे आवाहन
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अखिल भारतीय बंजारा क्रांती दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रावण चव्हाण होते. आपल्या अध्यक्षीय भाषणात त्यांनी समाजाच्या सद्यस्थितीवर आणि संघर्षावर भाष्य केले. भटक्या-विमुक्त समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाच्या विविध योजना उपलब्ध आहेत. या योजनांची माहिती तळागाळातील प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. समाजाने शिक्षणालाच आपले सर्वात मोठे शस्त्र बनवून विविध क्षेत्रांत आपले योगदान दिले पाहिजे, असे प्रतिपादन त्यांनी केले.
सांस्कृतिक दर्शन आणि गुणवंतांचा सत्कारया
कार्यक्रमाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा करण्यात आलेला विशेष सत्कार! प्रतिकूल परिस्थितीवर मात करून शैक्षणिक क्षेत्रात घवघवीत यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचे मान्यवरांच्या हस्ते कौतुक करण्यात आले. याच सोहळ्यात आयोजित करण्यात आलेल्या विविध सांस्कृतिक कार्यक्रमांमधून भटक्या-विमुक्त समाजाची समृद्ध कला, संस्कृती आणि त्यांच्या पारंपरिक जीवनपद्धतीचे अत्यंत विलोभनीय दर्शन घडविण्यात आले.
मान्यवरांची मांदियाळीया
सोहळ्याला समाजातील आणि प्रशासनातील अनेक प्रमुख मान्यवर उपस्थित होते. यामध्ये घुलिच्या उपसरपंच सुनिता तमाईचेकर, रघुनाथ बेलदार, रामकृष्ण मोरे, रणजित राजपूत, सुपडू खेडकर, महेंद्र खेडकर, आर.डी. मोरे, रवींद्र गोसावी, राकेश तमाईचेकर, मेहता जाधव, संजय साठे, प्रेमचंद चव्हाण, छगन पिसाळ, छगन कातोरे, रणजित चव्हाण, किशोर कोळकेकर, बंटी नेतलेकर, काजल मच्छले, सपना बाटुंगे, अविनाश चव्हाण, ॲड. विठ्ठल पथारिया आणि बाळू ठेलारी यांचा समावेश होता.
तसेच कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सहाय्यक संचालक सुंदरसिंग वसावे, निरीक्षक प्रदिप वसावे, निरीक्षक दिलीप कोकणी, लिपीक विशाल पाटील व इतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

जाहिरात
Dev-Mogra-Nandurbar-Ad-300x250