धक्कादायक! नातीच्या वेफरच्या पुड्यावरून वाद; तळोद्यात ६५ वर्षीय वृद्ध महिलेला घरात घुसून बेदम मारहाण

तळोदा :लहान मुलांच्या खाण्याच्या वस्तूवरून झालेल्या वादाचे पर्यवसान एका वृद्ध महिलेला अमानुष मारहाण होण्यात झाल्याची मन सुन्न करणारी घटना तळोदा तालुक्यातील मोरवड येथे घडली आहे. नातीचा वेफरचा पुडा का हिसकावला? असा साधा प्रश्न विचारल्याचा राग मनात धरून एका टोळक्याने घरात घुसून ६५ वर्षीय वृद्ध महिलेला बेदम मारहाण केली. याप्रकरणी तळोदा पोलीस ठाण्यात तीन जणांविरोधात विविध गंभीर कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
धक्कादायक! नातीच्या वेफरच्या पुड्यावरून वाद; तळोद्यात ६५ वर्षीय वृद्ध महिलेला घरात घुसून बेदम मारहाण

साध्या प्रश्नाचा आला रागतळोदा तालुक्यातील मोरवड येथील रहिवासी असलेल्या रमतूबाई किसन नाईक (वय ६५) यांच्या घरात हा प्रकार घडला. रमतूबाई यांच्या लहान नातीकडील वेफरचा पुडा संशयितांनी हिसकावून घेतला होता. याबाबत रमतूबाई यांनी “नातीच्या हातातील वेफरचा पुडा का हिसकावला?” अशी विचारणा केली. मात्र, या साध्या आणि हक्काच्या प्रश्नाचा समोरच्यांना प्रचंड राग आला.घरात घुसून बेदम मारहाण आणि जीवे मारण्याची धमकीयाच वादातून सतिष राजू ठाकरे, निलूबाई राजू ठाकरे आणि राजू उत्तम ठाकरे या तिघांनी थेट रमतूबाई यांच्या घरात बेकायदेशीरपणे प्रवेश केला. त्यांनी रमतूबाई यांना अश्लील शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. ६५ वर्षांच्या वृद्ध महिलेवर हात उचलताना संशयितांची जराही गय केली नाही. एवढेच नव्हे तर मारहाण केल्यानंतर त्यांनी रमतूबाई यांना “जीवनातून संपवून टाकू” अशी थेट जीवे मारण्याची धमकीही दिली.तळोदा पोलिसांत गुन्हा दाखलया भ्याड हल्ल्यानंतर गंभीर जखमी झालेल्या वृद्ध रमतूबाई नाईक यांनी तातडीने तळोदा पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दिली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी तत्परता दाखवत संशयित आरोपी सतिष राजू ठाकरे, निलूबाई राजू ठाकरे आणि राजू उत्तम ठाकरे यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम ३३३, ११५ (२), ३५२, ३५१ (२) आणि ३ (५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे मोरवड परिसरातील ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

जाहिरात
Dev-Mogra-Nandurbar-Ad-300x250
Follow Us: