तळोद्यात साळी समाजातर्फे भगवान श्री जिव्हेश्वर महाराज जन्मोत्सव उत्साहात; गुणवंत विद्यार्थी आणि जीवनगौरव पुरस्काराचे वितरण!
धार्मिक विधी आणि समाज भवनाचे भूमिपूजनउत्सवानिमित्त तळोदा शहरात भगवान श्री जिव्हेश्वर महाराजांच्या प्रतिमेचे पूजन, पोथी वाचन आणि सामूहिक सत्यनारायण पूजेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ‘देवकीप्रसाद साळी समाज भवनाचे’ भूमिपूजन गुरुप्रसाद विलास लांबोळे यांच्या हस्ते अत्यंत उत्साहात संपन्न झाले. या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ समाज बांधव मोहन ओंकार साळी होते. तर प्रमुख अतिथी म्हणून तळोद्याच्या उपनगराध्यक्ष भाग्यश्री चौधरी, राष्ट्रवादी काँग्रेसचे पॅनेल प्रमुख योगेश चौधरी आणि नगरसेवक कल्पेश चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते.
अम्युझिंग अचिव्हमेंट: अमेरिकेत झेंडा फडकवणाऱ्या ‘शिवम’चा विशेष गौरव!या सोहळ्याचे मुख्य आकर्षण ठरले ते समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक! यामध्ये अमेरिकेतील ॲरिझोनाच्या फिनिक्स येथे ड्रोन व विमान क्षेत्रातील उच्च तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या शिवम अविनाश बोरदे या तरुण सुपुत्राचा मान्यवरांच्या हस्ते विशेष गौरव करण्यात आला. त्याच्या या आंतरराष्ट्रीय यशाने संपूर्ण तळोदा शहराची मान अभिमानाने उंचावली आहे.तसेच बारावीच्या परीक्षेत घवघवीत यश मिळवल्याबद्दल निधी गणेश सोनवणे आणि शिष्यवृत्ती परीक्षेत यश संपादन केल्याबद्दल अपूर्वा संदीप साळी व हिमानी महेश बोरसे या गुणवंत विद्यार्थिनींचाही विशेष सन्मान करण्यात आला.
कै. इच्छाराम साळी यांना ‘जीवनगौरव पुरस्कार’ जाहीर साळी समाजातर्फे दिला जाणारा यंदाचा प्रतिष्ठित ‘साळी समाज जीवनगौरव पुरस्कार’ कै. इच्छाराम साळी यांना मरणोत्तर जाहीर करण्यात आला. समाजासाठी त्यांनी दिलेल्या योगदानाचा आदर ठेवून त्यांच्या वतीने हा पुरस्कार सुरेश इच्छाराम साळी यांनी मान्यवरांच्या हस्ते स्वीकारला.या संपूर्ण कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन वैशाली महेश बोरदे यांनी केले, तर उपस्थितांचे आभार डॉ. नितीन साळी यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नंदुरबार जिल्हा साळी समाज मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी अतोनात परिश्रम घेतले.

