तळोदा तहसील कार्यालयातील स्वच्छतागृहाची प्रचंड दुरावस्था; दुर्गंधीमुळे नागरिक हैराण, प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष!
ग्रामीण भागातील नागरिकांचे अतोनात हाल
तळोदा तहसील कार्यालयात ग्रामीण आणि दुर्गम भागातील शेकडो नागरिक दररोज विविध शासकीय कामांसाठी येत असतात. महसूल विभागाशी संबंधित कामे, विविध दाखले, प्रमाणपत्रे, शासकीय योजनांचे अर्ज आणि इतर प्रशासकीय बाबींसाठी नागरिकांना येथे तासनतास थांबावे लागते. अशा वेळी पुरुष, महिला, लहान मुले आणि वृद्ध नागरिकांसाठी स्वच्छतागृहाची सुविधा असणे ही अत्यंत महत्त्वाची गरज आहे. मात्र, येथील स्वच्छतागृहाची नियमित साफसफाई आणि देखभाल होत नसल्याने ते वापरणे अशक्य झाले आहे.
महिला आणि ज्येष्ठ नागरिकांची मोठी कोंडी
स्वच्छतागृहाच्या परिसरात स्वच्छतेचा पूर्णपणे अभाव असून प्रचंड अस्वच्छतेमुळे रोगराई पसरण्याची भीती निर्माण झाली आहे. या गंभीर दुरावस्थेचा सर्वाधिक फटका कार्यालयात येणाऱ्या महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना बसत असून त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. प्रशासकीय अधिकारी वातानुकूलित केबिनमध्ये बसत असताना, करदात्या नागरिकांना मात्र अशा मूलभूत सुविधेसाठीही हाल अपेष्टा सहन कराव्या लागत आहेत, हे अत्यंत दुर्दैवी आहे.
तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी
“स्वच्छ भारत अभियानाचा” ढोल पिटणाऱ्या प्रशासनाला आपल्याच मुख्य कार्यालयातील स्वच्छतागृहाची दुरवस्था दिसत नाही का? असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत. संबंधित विभागाने केवळ नावाला साफसफाई न करता, या स्वच्छतागृहाची नियमित स्वच्छता ठेवावी, पुरेसा पाणीपुरवठा उपलब्ध करावा आणि आवश्यक असलेली पडझड व दुरुस्ती तातडीने पूर्ण करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. आता तरी प्रशासन या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

