मुंबई: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले संविधान हे समाजपरिवर्तनाचे शक्तिशाली साधन आहे. त्यांच्या विचारांमुळेच वंचित, पीडित आणि दुर्बल घटकांना आत्मसन्मान, समान संधी, न्यायाचा मार्ग मिळाला आहे. संविधानातील घटनात्मक पायाभरणीमुळे भारताची लोकशाही सशक्त झाली आहे, असे प्रतिपादन राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी केले. दादर येथील चैत्यभूमी येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त आयोजित अभिवादन कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा, सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार, मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड, सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, महापौर रितू तावडे उपस्थित होते.
राज्यपाल जिष्णु देव वर्मा म्हणाले, स्त्री-पुरुष समानतेच्या बाबतीतही डॉ. आंबेडकर अग्रणी होते. महिलांना शिक्षण, संपत्ती आणि वैयक्तिक स्वातंत्र्याचे हक्क मिळवून देण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. त्यांच्या योगदानामुळेच भारत प्रजासत्ताक झाल्यापासून महिलांना समान मतदानाचा अधिकार मिळाला. महाड चवदार तळे सत्याग्रहाच्या शताब्दी वर्षाची सुरुवात होत असून, या निमित्ताने जातीयतेपासून मुक्त आणि भेदभावविरहित समाज घडविण्याचा संकल्प करावा, असे आवाहन राज्यपालांनी यावेळी केले.
लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधील त्यांच्या संशोधनातून डॉ. आंबेडकरांनी भारतात केंद्रीय बँकेची गरज अधोरेखित केली होती. त्यांच्या विचारांवर आधारितच पुढे ‘रिझर्व बँक ऑफ इंडिया’ची स्थापना झाली. तसेच ‘गोल्ड स्टँडर्ड’ आणि चलनाच्या खरेदी शक्तीबाबत त्यांनी मांडलेले विचार आजच्या जागतिक अर्थव्यवस्थेतही मोलाचे ठरत आहेत. त्यांच्या ‘प्रॉब्लेम्स ऑफ रुपी’ या प्रबंधातून रिझर्व्ह बँकेच्या स्थापनेचा पाया रचला गेला. १९२३ मध्ये डॉ. आंबेडकरांनी मांडलेल्या आर्थिक विचारांच्या आधारावरच आज जग वाटचाल करत आहे. त्यांच्या प्रबंधात मांडलेल्या तत्त्वांवरच भारताची अर्थव्यवस्था उभी आहे, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर माणुसकीचे शिल्पकार – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले संविधान हाच आपला राष्ट्रधर्म असून बाबासाहेब हे केवळ भारतीय संविधानाचे शिल्पकार नसून माणुसकीचेही शिल्पकार आहेत. त्यांनी लिहिलेल्या राज्यघटनेमुळे देशातील शेवटच्या माणसालाही न्याय आणि सन्मान मिळण्याचा मार्ग सुकर झाला, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
महापुरुष शांततेतून जेव्हा कृती करतात, तेव्हा ती क्रांती ठरते. महाड चवदार तळे सत्याग्रहातून समाजात आत्मसन्मानाची जाणीव निर्माण झाली. बाबासाहेबांनी आयुष्यभर शोषित, दलित आणि वंचित घटकांसाठी काम करून त्यांना सक्षम केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानामुळे भारताची लोकशाही जगात भक्कमपणे उभी आहे. इंदू मिल येथे उभारण्यात येत असलेल्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्मारकाचे काम वेगाने सुरू असून हे स्मारक पुढील पिढ्यांसाठी प्रेरणास्थान ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
भारतभर साजरी होणारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती ही स्वाभिमान आणि विवेकाचा उत्सव असून त्यांचे विचार जपणे आणि ते आचरणात आणणे, हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल.
चैत्यभूमी बाबासाहेबांच्या विचारांचे ऊर्जा केंद्र – उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती ही प्रेरणा, संकल्प आणि कृतज्ञता व्यक्त करण्याचा तसेच त्यांच्या विचारांचे स्मरण करण्याचा दिवस आहे. डॉ. आंबेडकर यांच्या मानवकल्याणाच्या विचारांना पुढे नेणे आणि समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन देशाचा सर्वांगीण व वेगवान विकास साधणे हेच त्यांना खरे अभिवादन असल्याचे त्यांनी सांगितले. चैत्यभूमी ही बाबासाहेबांच्या विचारांचे ऊर्जा केंद्र असल्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी सांगितले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे कायदेतज्ज्ञ, घटनातज्ज्ञ आणि अर्थतज्ज्ञ होते. एकता, समता आणि बंधुता या मूल्यांमध्ये समाजाला बांधून त्यांनी प्रत्येकाला सन्मानाने व स्वाभिमानाने जगण्याचा मार्ग दाखवला. त्यांच्या विचारांची मशाल सतत तेवत ठेवून त्यानुसार आचरण करणे गरजेचे आहे. इंदू मिलच्या जागेवर उभारण्यात येत असलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक जगाला शांतता आणि समतेचा संदेश देणारे केंद्र ठरेल, असा विश्वासही उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केला.
सर्वप्रथम भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त राज्यपाल जिष्णु देव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्यासह मान्यवरांनी पुष्प अर्पण करून डॉ. बाबासाहेबांना अभिवादन केले. यावेळी राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते सर्व भिक्खूंना चिवरदान देण्यात आले. त्यानंतर बृहन्मुंबई महानगरपालिकेच्यावतीने आयोजित छायाचित्र प्रदर्शनास मान्यवरांनी भेट दिली. यावेळी चैत्यभूमीवर हेलिकॉप्टर मधून पुष्पवृष्टी करण्यात आली. यावेळी सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्या एक वर्षाच्या कामकाजावर आधारित ‘समाजनायक संजय शिरसाट’ या पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
मुंबई महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी यावेळी आभार व्यक्त केले.या कार्यक्रमास आमदार कालिदास कोळंबकर, आमदार दीपक केसरकर, आमदार सना मलिक, माजी खासदार राहुल शेवाळे, मुख्य सचिव राजेश अग्रवाल, पोलीस महासंचालक सदानंद दाते, मुंबई महापालिका आयुक्त अश्विनी भिडे, कोकण विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल, सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे माजी खासदार राहुल शेवाळे, तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू भीमराव आंबेडकर, भन्ते डॉ. राहुल बोधी महाथेरो, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीचे सरचिटणीस नागसेन कांबळे आदींसह समाजाच्या सर्वक्षेत्रातील मान्यवर तसेच डॉ. बाबासाहेबांचे अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
















