Home महाराष्ट्र ‘इंडिया स्किल्स’ स्पर्धेत महाराष्ट्राची दमदार कामगिरी; ४ सुवर्ण पदकांसह एकूण १७ पदक केली प्राप्त

‘इंडिया स्किल्स’ स्पर्धेत महाराष्ट्राची दमदार कामगिरी; ४ सुवर्ण पदकांसह एकूण १७ पदक केली प्राप्त

0
‘इंडिया स्किल्स’ स्पर्धेत महाराष्ट्राची दमदार कामगिरी; ४ सुवर्ण पदकांसह एकूण १७ पदक केली प्राप्त
Maharashtra's strong performance in the 'India Skills' competition; won a total of 17 medals, including 4 gold medals

मुंबई:  ‘वर्ल्ड स्किल्स’ स्पर्धेसाठी रंगीत तालीम मानल्या जाणाऱ्या ‘इंडिया स्किल्स २०२५-२६’ स्पर्धेत महाराष्ट्रातील स्पर्धकांनी ४ सुवर्ण, ८ रौप्य आणि ५ कांस्य पदकांची अशी एकूण १७ पदके प्राप्त केली आहेत. उत्तर प्रदेश येथे ग्रेटर नोएडा मधील इंडिया एक्स्पो सेंटर अँड मार्ट येथे ही स्पर्धा पार पडली. आगामी २०२७-२०२८ ची ही स्पर्धा मुंबईत होण्यासाठी शिफारस करण्यात आली आहे. या यशाबद्दल कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी संपूर्ण चमूचे आणि विजेत्या खेळाडूंचे मनापासून अभिनंदन केले आहे.

मंत्री मंगलप्रभात लोढा म्हणाले की, केंद्रीय कौशल्य विकास मंत्री जयंत चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीत विद्यार्थ्यांचा गुण गौरव समारंभ पार पडला आहे. महाराष्ट्रातील तरुणांमध्ये अफाट कौशल्य आहे, हे या निकालाने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. जागतिक स्तरावर भारताचे नेतृत्व करण्याची क्षमता आपल्या तरुणांमध्ये आहे. पदके जिंकणाऱ्या सर्व उमेदवारांचे आणि त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या संस्थांचे मी अभिनंदन करतो. आगामी वर्ल्ड स्किल्स स्पर्धेतही महाराष्ट्र अशीच उत्तुंग कामगिरी करेल, याची मला खात्री आहे. महाराष्ट्र २०२७ मध्ये राज्यस्तरीय महिला कौशल्य चॅम्पियन्स ही स्पर्धा सुरू करणार आहे.

कौशल्य,रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग, महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास संस्था आणि व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळ, उद्योग भागीदार व तांत्रिक संस्था यांनी हे यश मिळवण्यासाठी गेल्या वर्षभरापासून विशेष मेहनत घेतली होती. सुमारे १५,२७५ नोंदणीकृत उमेदवारांमधून जिल्हा, विभाग आणि राज्यस्तरावरील चाळणी परीक्षेतून ५४ सर्वोत्तम उमेदवारांची राष्ट्रीय स्तरासाठी निवड करण्यात आली होती. स्पर्धेपूर्वी या उमेदवारांना तज्ज्ञांमार्फत विशेष ‘बूटकॅम्प’ प्रशिक्षण आणि मानसिक तयारीसाठी समुपदेशनही देण्यात आले होते. इंडिया स्किल्स स्पर्धेतील या विजयामुळे महाराष्ट्रातील यशस्वी उमेदवारांना आता आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणार आहे. २०२६ मध्ये चीनमधील शांघाय येथे सप्टेंबर मध्ये होणाऱ्या ‘वर्ल्ड स्किल्स’ स्पर्धेसाठी आता या विजेत्यांच्या प्रशिक्षणाची पुढील फेरी लवकरच सुरू होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here