Home टेक न्युज ओबीसी, वीजेएनटी व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी नवी शासकीय वसतिगृह सुविधा

ओबीसी, वीजेएनटी व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी नवी शासकीय वसतिगृह सुविधा

0
New government hostel facility for students belonging to OBC, VJNT, and Special Backward Class categories.

इतर मागासवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या वतीने मुंबई शहर जिल्ह्यात शासकीय वसतिगृह सुरू करण्यात आले आहे. हे वसतिगृह मुंबईतील वाशी, नवी मुंबई येथील सेक्टर १९ ब, प्लॉट क्र. ९, पहिला मजला येथे सुरू करण्यात आले आहे.

२०२६-२७ पासून या वसतिगृहासाठी विहित मुदतीत अर्ज करणाऱ्या व्यावसायिक तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षात प्रवेश घेतलेल्या पात्र विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार आहे. तसेच पदविका अभ्यासक्रम उत्तीर्ण विद्यार्थ्यांना पदवी अभ्यासक्रमाच्या द्वितीय वर्षात प्रवेश घेताना त्याच पदवी अभ्यासक्रमाच्या द्वितीय वर्षाकरिता प्रवेश देण्यात येईल. त्यानंतर योजनेंतर्गत जागा रिक्त राहिल्यास पात्र विद्यार्थ्यांना अनुक्रमे तृतीय व चतुर्थ वर्षात प्रवेश देण्यात येणार आहे. तथापि, द्वितीय, तृतीय व चतुर्थ वर्षात प्रवेश देताना विद्यार्थ्यांच्या बारावी परीक्षेतील अंतिम निकालाचे गुण विचारात घेण्यात येतील.

२०२६-२७ साठी वसतिगृहातील प्रवेशामध्ये जात प्रवर्गनिहाय आरक्षण निश्चित करण्यात आले आहे. त्यानुसार इतर मागासवर्गासाठी ५१ टक्के, विमुक्त जाती व भटक्या जमातींसाठी ३३ टक्के, विशेष मागास प्रवर्गासाठी ६ टक्के, दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी ४ टक्के, अनाथ विद्यार्थ्यांसाठी २ टक्के आणि आर्थिक मागास प्रवर्गासाठी ४ टक्के आरक्षण राहणार आहे.

वसतिगृह प्रवेशासंदर्भातील शासन निर्णयातील अटी व शर्ती तसेच वसतिगृहाबाबत अधिक माहितीसाठी सहाय्यक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण, मुंबई शहर, नवीन प्रशासकीय इमारत, चौथा मजला, आर. सी. चेंबूरकर मार्ग, चेंबूर (पूर्व), मुंबई येथे संपर्क साधावा.