
महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ आणि अखिल भारतीय मराठीचित्रपट महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘पडद्यावरचा सिनेमा, पडद्यामागचं गणित’ (समजूया मराठी चित्रपटाचे अर्थकारण) या विषयावर एकदिवसीय परिसंवादाचे आयोजन मंगळवार 18 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत प्रभादेवी येथील पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या रवींद्र नाट्य मंदिरात करण्यात आले आहे. सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांची कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती असेल.
सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी, महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात येत आहे. मराठी चित्रपटसृष्टीसमोरील बदलती व्यावसायिक आव्हाने, चित्रपट निर्मितीमागील आर्थिक गणित, वितरण, प्रमोशन, मार्केटिंग तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर मराठी चित्रपटांना मिळणाऱ्या संधी या विविध विषयांवर परिसंवादात सखोल चर्चा होणार आहे.
परिसंवादाच्या पहिल्या सत्रात ‘मराठी चित्रपट आणि व्यावसायिक आव्हाने’ या विषयावर चर्चा होणार आहे. दुसऱ्या सत्रात ‘डिस्ट्रिब्यूशन, प्रमोशन, मार्केटिंग आणि फिल्म फेस्टिव्हल प्रमोशन’ या विषयावर मार्गदर्शन आणि चर्चा होणार आहे. यानंतरच्या सत्रात आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलसाठी चित्रपट कसा पाठवावा, आंतरराष्ट्रीय फंडिंग व को-प्रॉडक्शन कसे मिळवावे आणि स्क्रिप्ट लॅबच्या माध्यमातून चित्रपटाला आंतरराष्ट्रीय संधी कशा उपलब्ध करून देता येतील, याबाबत चर्चा करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमात मेघराज राजेभोसले, महेश मांजरेकर, राजेश म्हापुसकर, अमृता राव, जयंत सोमणकर, अश्विन कुमार शर्मा, गणेश गारगोटे, अजय फुटाणे, सादिक चितळीकर, समृद्धी पोरे, लीना खोब्रागडे आदि मान्यवर उपस्थित राहून मार्गदर्शन करतील. परिसंवादाच्या अखेरच्या सत्रात खुली चर्चा, प्रस्ताव, प्रश्नोत्तरे आणि मुक्त संवाद आयोजित करण्यात आला आहे.















