Home महाराष्ट्र प्रधानमंत्री किसान मानधन योजना:वृद्धापकाळात शेतकऱ्यांना दरमहा 3 हजार रुपये पेन्शन

प्रधानमंत्री किसान मानधन योजना:वृद्धापकाळात शेतकऱ्यांना दरमहा 3 हजार रुपये पेन्शन

0
Pradhan Mantri Kisan Maandhan Yojana: Pension of Rs 3,000 per month to farmers in old age

(नंदुरबार) प्रधानमंत्री किसान मानधन योजना (PM-KMY) या योजनेअंतर्गत सर्व पात्र अल्प व अत्यल्प भुधारक शेतकऱ्यांना दरमहा रुपये 3 हजार पेन्शन देण्यात येणार असून जास्तीत जास्त पात्र अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हा नोडल अधिकारी पी.एम. किसान तथा, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शंकर किरवे यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

ही योजना शेतकऱ्यांना वृद्धापकाळात आर्थिक सुरक्षा आणि सामाजिक सुरक्षा प्रदान करण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आली असून 18 ते 40 वर्षे वयोगटातील शेतकरी योजनेत सहभागी होण्यास पात्र आहेत. तसेच भू-अभिलेखांनुसार ज्या शेतकऱ्यांच्या नावे 2 हेक्टर पर्यंत लागवडीलायक क्षेत्र आहे, असे अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी पात्र ठरतील.

ही एक ऐच्छिक आणि अंशदायी पेन्शन योजना असून पात्र शेतकऱ्यांना वयाच्या 60 वर्षांनंतर दरमहा किमान रुपये 3 हजार निश्चित पेन्शन मिळेल. यासाठी शेतकऱ्यांनी त्यांच्या 18 ते 40 या वयानुसार दरमहा रुपये 55/- ते रुपये 200/- पर्यंत वयाच्या 60 वर्षांपर्यंत मासिक हप्ता भरावयाचा आहे. शेतकऱ्याच्या मासिक हप्त्याइतकीच रक्कम केंद्र सरकार पेन्शन फंडात जमा करते.

इच्छुक शेतकरी जवळच्या सामाईक सुविधा केंद्रामार्फत (CSC) किंवा ऑनलाइन पोर्टल https://www.pmkmy.gov.in वर स्व-नोंदणी करावी. नोंदणीसाठी आधारकार्ड, बँक पासबुक, मोबाईल नंबर आदि कागदपत्रे आवश्यक आहेत.

प्रधानमंत्री किसान मानधन योजनेमध्ये शेतकऱ्यांना वृद्धापकाळात निवृत्ती वेतन मिळणार असल्याने जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेत सहभागी होण्यासाठी पोर्टलवर ऑनलाईन नोंदणी करावी, असेही जिल्हा नोडल अधिकारी पी.एम. किसान तथा, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी श्री. किरवे यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.