
योजनेचे काम गतीने पूर्ण करून शहरवासीयांना शुद्ध व नियमित पाणीपुरवठा करावा, असे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भातील बैठकीत दिले.
बैठकीस सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट, खासदार संदिपान भुमरे, आमदार सतीश चव्हाण, माजी खासदार डॉ. भागवत कराड उपस्थित होते, तर दूरदृश्य संवादप्रणालीद्वारे मंत्री अतुल सावे, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील आदी बैठकीत सहभागी झाले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले,
कंत्राटदाराने व संबंधित यंत्रणांनी पाणीपुरवठा योजनेचे काम पूर्णत्वास नेण्यासाठी टप्पे निश्चित करावेत तसेच योजनेची अर्धवट झालेली कामे कंत्राटदारामार्फत तातडीने पूर्ण करून घ्यावीत.
पाण्याच्या टाक्यांची बांधकामे पूर्ण करण्यात यावीत. शहरातील वितरण प्रणालीचे कामही पूर्णत्वास न्यावे. अर्धवट कामांमुळे शहरवासीयांना पूर्ण क्षमतेने पाणीपुरवठा करता येत नाही.
योजनेच्या कामासाठी संबंधित विभागाने स्थळपाहणी करून सद्यस्थितीबाबत कंत्राटदारासोबत स्वतंत्र बैठक घ्यावी.
कुठल्याही परिस्थितीत योजनेचे काम विहित कालावधीत पूर्ण करावे. शेवटच्या शहरवासीयाला नियमित व शुद्ध पाण्याचा पुरवठा करणे हे शासनाचे कर्तव्य आहे. त्यानुसार संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करून योजना पूर्णत्वास न्यावी.
शहरातील नळजोडण्यांचे प्रमाण वाढवावे. कंत्राटदाराच्या कामाचे मूल्यांकन करून वेळोवेळी कामाचा आढावा घ्यावा. संबंधित कंत्राटदाराकडून पाणीपुरवठा वितरण प्रणालीचे ‘हायड्रॉलिक टेस्टिंग’ पूर्ण करावे.
पाणीपुरवठा योजनेविषयी थोडक्यात…
छत्रपती संभाजीनगर शहराला सन २०५२ मधील लोकसंख्येच्या गरजेनुसार ६०४ एमएलडी (मिलियन लिटर प्रतिदिन) पाणीपुरवठा गृहीत धरून जायकवाडी प्रकल्पावरून पाणीपुरवठा योजना राबविण्यात येत आहे.
पाणी वितरणासाठी शहरात ५९ पाण्याच्या टाक्या बांधण्यात येणार असून, त्यापैकी २९ पाण्याच्या टाक्या पूर्ण झाल्या आहेत.
शहरातील १,९११ किलोमीटर पाणीपुरवठा वितरण प्रणालीपैकी १,२९१ किलोमीटर पाईपलाईनचे काम पूर्ण झाले आहे.
योजनेअंतर्गत ४६ हजार ५०० नळजोडण्या देण्यात आल्या आहेत















