Home महाराष्ट्र अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांना दिलासा;953 शेतकरी लाभार्थी; 373.67 हेक्टर क्षेत्रासाठी 66.57...

अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांना दिलासा;953 शेतकरी लाभार्थी; 373.67 हेक्टर क्षेत्रासाठी 66.57 लाख रुपयांची मदत मंजूर

1
Relief for farmers affected by unseasonal rains in the district; 953 farmers benefited; Rs 66.57 lakh aid approved for 373.67 hectares of area

(नंदुरबार) मार्च-2026 दरम्यान झालेल्या अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या नंदुरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांना राज्य शासनाने मोठा दिलासा दिला असून जिल्ह्यातील 953 बाधित शेतकऱ्यांसाठी 66 लाख 57 हजार रुपयांच्या मदतीस मंजुरी देण्यात आली आहे. या मदतीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आगामी हंगामासाठी आधार मिळणार असून शेती पुनर्बांधणीस मदत होणार आहे.

महसूल व वन विभागाच्या शासन निर्णयानुसार मार्च-2026 या कालावधीत राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतीपिकांचे नुकसान झाले होते. या पार्श्वभूमीवर राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून शेतकऱ्यांना मदत देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. राज्यभरातील बाधित शेतकऱ्यांसाठी एकूण 164 कोटी 83 लाख 44 हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

नाशिक विभागातील नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव आणि अहिल्यानगर या जिल्ह्यांचा समावेश असून या विभागासाठी एकूण 145 कोटी 87 लाख 70 हजार रुपयांची मदत मंजूर करण्यात आली आहे. त्यापैकी नंदुरबार जिल्ह्यासाठी 66.57 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. जिल्ह्यातील 953 शेतकरी या मदतीस पात्र ठरले असून 373.67 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान नोंदविण्यात आले आहे.

शासन निर्णयानुसार ही मदत डीबीटी प्रणालीद्वारे थेट लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे. मदत वितरण करताना एका हंगामात एकदाच मदत देण्याचे निकष लागू राहणार असून लाभार्थ्यांची माहिती संबंधित यंत्रणांकडून संगणकीय प्रणालीवर अद्ययावत करण्यात येणार आहे. तसेच कोणत्याही प्रकारची द्विरुक्ती होणार नाही याची दक्षता तहसीलदार व जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत घेण्यात येणार आहे.

नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित शेतकऱ्यांना दिलेला मदतीचा निधी बँकांनी कर्ज खात्यात वळता करू नये, अशा सूचनाही शासनाने संबंधित बँकांना देण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. लाभार्थ्यांची यादी व मदतीचा तपशील जिल्ह्याच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचेही शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे.

राज्यातील शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीच्या संकटातून सावरण्यासाठी शासन कटिबद्ध असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने ही कार्यवाही करण्यात येत असल्याचे शासनाने स्पष्ट केले आहे.