
महाराष्ट्र सदन आणि दक्षिण मध्य सांस्कृतिक केंद्र, नागपूर (संस्कृती मंत्रालय, भारत सरकार) यांच्या संयुक्त विद्यमाने दिल्लीकरांना रांगोळी कलेचा सुंदर आविष्कार दर्शविणाऱ्या रांगोळी प्रदर्शनाचे आयोजन उत्साहात करण्यात आले. यानिमित्ताने रांगोळी कार्यशाळा आणि रांगोळी स्पर्धाही घेण्यात आली. राजधानीतील नागरिकांचा या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
सुप्रसिद्ध रांगोळी कलाकार गायत्री पाटील आणि प्रतीक पानसरे यांनी कार्यशाळेत सहभागी कलाकारांना विविध रांगोळी शैलींचे प्रात्यक्षिकांसह प्रशिक्षण दिले. संस्कार भारती, गालिचा, लॅंडस्केप, पोर्ट्रेट आणि पोस्टर रांगोळी यांसारख्या पारंपरिक व आधुनिक शैलींची रचना, रंगसंगती, प्रमाणबद्धता, रेषांचे नियोजन आणि कलात्मक मांडणी याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले. सुप्रसिद्ध रांगोळी कलाकार गणेश खरे यांनी साकारलेली छत्रपती शिवाजी महाराजांची भव्य रांगोळी या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरली.
रांगोळी स्पर्धेलाही कलाकारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. स्पर्धेतील विविध कलाकृतींचे प्रदर्शन नागरिकांसाठी दोन दिवस खुले ठेवण्यात आले आहे. स्पर्धेत श्रीमती संजू गौतम यांनी प्रथम क्रमांक पटकावला. माही मित्तल आणि अनन्या मित्तल यांनी द्वितीय, तर यशोदा मनुलकर यांनी तृतीय क्रमांक मिळविला. जया व सुवर्णा तसेच मीना हरणे यांना प्रोत्साहनपर बक्षिसांनी गौरविण्यात आले. रांगोळी स्पर्धेच्या परीक्षक म्हणून सुप्रिया देवस्थळी, सह महालेखानियंत्रक, भारत सरकार, रांगोळी कलाकार गणेश खरे आणि फाइन लाइन आर्ट अकादमीचे आशिष देशमुख यांनी काम पाहिले.
बक्षीस वितरण सोहळ्यात मार्गदर्शन करताना सुप्रिया देवस्थळी यांनी रांगोळी कलेतील प्रमाणबद्धता, रंगसंगती, रेषांचे अचूक नियोजन आणि सातत्यपूर्ण सरावाचे महत्त्व अधोरेखित केले. या कलेचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी तसेच नव्या पिढीला या कलेशी जोडण्यासाठी अशा उपक्रमांची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
समारोपप्रसंगी निवासी आयुक्त तथा सचिव डॉ. श्वेता सिंघल यांच्या हस्ते विजेत्यांना बक्षिसे व प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली. रांगोळी ही महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेचे प्रतीक असून, अशा उपक्रमांच्या माध्यमातून महाराष्ट्राची लोककला देशाच्या राजधानीत नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न असल्याचे डॉ. सिंघल यांनी सांगितले. महाराष्ट्र सदन हे दिल्लीतील मराठी बांधवांसाठी ‘होम अवे फ्रॉम होम’ ठरावे, यासाठी विविध सांस्कृतिक उपक्रम राबविण्यात येत असल्याचे त्यांनी नमूद केले. सप्टेंबरच्या तिसऱ्या रविवारपासून दर महिन्याला निवडक मराठी चित्रपटाचे प्रदर्शन करणारा ‘फिल्म क्लब’ सुरू करण्यात आला असून, महाराष्ट्रीय खाद्यसंस्कृती आणि पारंपरिक वस्तूंच्या खरेदीसाठीही विविध उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती डॉ. सिंघल यांनी दिली.
यावेळी महाराष्ट्र परिचय केंद्राचे संचालक हेमराज बागुल, सहायक निवासी आयुक्त नितीन शेंडे, दक्षिण मध्य सांस्कृतिक केंद्र, नागपूरचे सहायक संचालक दीपक कुलकर्णी, जनसंपर्क अधिकारी मनीषा पिंगळे, व्यवस्थापक प्रमोद कोलापत्ते, सारिका शेलार यांच्यासह कला क्षेत्रातील मान्यवर, कलाकार, विद्यार्थी, कलाप्रेमी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.















