शालेय शिक्षणात गुणवत्तावृद्धी घडवत विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्व, संवादकौशल्य आणि चांगल्या नागरिकत्वाचे गुण विकसित करण्यासाठी मूल्य शिक्षणाला विशेष महत्त्व असून सजग आणि जबाबदार नागरिक घडवण्यासाठी मूल्य आधारित शिक्षण काळाची गरज आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात मूल्यवर्धन कार्यक्रमाच्या दुसऱ्या टप्प्याची (२.०) अंमलबजावणी व्यापक स्तरावर करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.
शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठकीत सहभागी झाले. राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, सामाजिक कार्यकर्ते शांतीलाल मुथ्था, मुख्यमंत्री कार्यालयाचे अपर मुख्य सचिव लोकेश चंद्र, प्रधान सचिव डॉ. श्रीकर परदेशी, शालेय शिक्षण विभागाचे सचिव रणजितसिंह देओल, शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह, एससीईआरटीचे संचालक हेमंत वसेकर यांच्यासह एसबीआय बॅंक, बंधन बॅंक फाउंडेशन तसेच फिरोदीया फाउंडेशन आणि शांतीलाल मुथ्था फाउंडेशन या भागीदार संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
शिक्षण क्षेत्रात अभ्यासक्रमासोबत शिक्षकांची अध्यापन पद्धती, विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याची क्षमता आणि त्यांच्यात सकारात्मक परिवर्तन घडवून आणण्याची भूमिका अधिक महत्त्वाची आहे. मूल्यवर्धन कार्यक्रमांतर्गत शिक्षकांना दिले जाणारे प्रशिक्षण विद्यार्थ्यांमधील भीती, संकोच आणि शंका दूर करण्यास मदत आणि ज्ञानार्जनाची प्रक्रिया अधिक प्रभावी बनवत आहे. हे लक्षात घेऊन कार्यक्रमाच्या पुढील टप्प्यांची अधिक प्रभावी अमंलबजावणी करावी. शिक्षण विभाग, प्रशिक्षण संस्था आणि भागीदार संघटनांनी समन्वयाने काम करून शिक्षणाची गुणवत्ता अधिक उंचावण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवावेत. मूल्य शिक्षणाची चळवळ येत्या काळात व्यापक करण्याची गरज आहे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
०००
या उपक्रमामुळे विद्यार्थी आणि पालकांचा सहभाग वाढत असून शाळांमध्ये लक्षणीय बदल घडत आहे. शिक्षकांमध्ये सकारात्मक दृष्टीकोन विकसित करण्याबरोबरच विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण, संवादकौशल्य आणि सामाजिक जबाबदारीची जाणीव निर्माण करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत असून त्याची राज्यासह देशपातळीवर दखल घेतली जात आहे – शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे