
मुंबई : हॉटेल्स, उपाहारगृहे, भोजन व्यवस्था पुरवठादार तसेच खाद्यपदार्थ विक्रेत्यांना विक्री पावती, मेन्यू कार्ड तसेच दर फलकांवर ‘चीज ॲनालॉग’चा स्पष्ट उल्लेख करणे बंधनकारक असून अन्न व औषध प्रशासनाने राज्यभर ‘चीज ॲनालॉग’बाबत विशेष तपासणी मोहीम हाती घेतली आहे. याची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी सर्व विभागीय अन्न सहआयुक्तांना दिले आहेत.
१ मे २०२६ पासून या नियमाची कडक अंमलबजावणी केली जात आहे. राज्यव्यापी विशेष तपासणी मोहिमेत पहिल्या दहा दिवसात १ हजार ४९६ आस्थापनांची तपासणी करण्यात आली आहे. मंत्री झिरवाळ यांनी महाराष्ट्रात सुरू केलेल्या या मोहिमेची दखल केंद्र सरकारच्या (अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरणाने घेतली आहे. त्यामुळे शुद्ध पनीरसाठी महाराष्ट्राने दाखवलेली दिशा आता संपूर्ण देशासाठी मार्गदर्शक ठरणार आहे.
ग्राहकांच्या आरोग्य सुरक्षेला बळकटी
ग्राहकांना योग्य माहिती उपलब्ध व्हावी यासाठी संबंधित उत्पादनाचा उल्लेख, विक्री पावती, भोजन सूची आणि इलेक्ट्रॉनिक दर्शक फलकांवर स्पष्टपणे करणे अनिवार्य करण्यात आले आहे. भेसळ करणाऱ्यांवर प्रभावी नियंत्रण येण्यास मदत होणार असून ग्राहकांच्या आरोग्य सुरक्षेला अधिक बळकटी मिळणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
प्रशासनाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार मुंबई, कोकण, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नागपूर आणि अमरावती विभागांमध्ये व्यापक तपासण्या करण्यात आल्या. राज्यभरातील २७५ अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी एकूण १ हजार ४९६ आस्थापनांची तपासणी केली. त्यापैकी ८७१ आस्थापनांमध्ये ‘चीज ॲनालॉग’चा उल्लेख नियमानुसार आढळून आला, तर आवश्यक उल्लेख नसल्याने ३२० आस्थापनांना कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.
दुग्धभेसळ प्रतिबंधासाठी प्रशासनाने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्याचाही निर्णय घेतला आहे. दूध परीक्षण यंत्रे, त्वरित चाचणी संच तसेच दूध विश्लेषण प्रणाली यांसारखी आधुनिक उपकरणे उपलब्ध करून देण्यात येत असून, राज्यातील फिरत्या अन्न परीक्षण प्रयोगशाळांची संख्या वाढविण्याची कार्यवाही सुरू आहे. तसेच नियमित तपासण्या, प्रशिक्षण आणि जनजागृती मोहिमांवर विशेष भर दिला जात आहे.
यामुळे ग्राहकांना ‘शाही पनीर’सारख्या पदार्थांमध्ये प्रत्यक्ष पनीर वापरण्यात आले आहे की ‘चीज ॲनालॉग’, याची स्पष्ट माहिती मिळणार आहे. अन्न व औषध प्रशासनाने हॉटेल संघटनांशी चर्चा करून नव्या नियमांविषयी जनजागृती सुरू केली असून, उपाहारगृहे व भोजन व्यवस्था पुरवठादारांना सामूहिक संदेशाद्वारे मार्गदर्शक सूचना पाठविण्यात येत आहेत. याशिवाय राज्यभर तपासणी मोहीम राबवून आवश्यकतेनुसार नमुने संकलित करून प्रयोगशाळा परीक्षणाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
ग्राहकांनी कोणतेही उत्पादन खरेदी करताना त्यावरील माहितीपत्रक काळजीपूर्वक वाचावे तसेच ‘दुग्ध पर्यायी पदार्थ’ असा उल्लेख आहे का, याची खात्री करावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. ग्राहकांची दिशाभूल झाल्यास १८००-२२२-३६५ या विनामूल्य दूरध्वनी क्रमांकावर तक्रार नोंदविण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.
अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरणाच्या अन्न सुरक्षा मानके व अन्न मिश्रित पदार्थ नियमावली २०११ नुसार ‘पनीर’ हा केवळ दुधापासून तयार करण्यात येणारा पदार्थ मानला जातो. मात्र ‘चीज ॲनालॉग’ अथवा ‘दुग्ध पर्यायी पदार्थ’ हे उत्पादन खाद्यतेल, स्टार्च, मिश्रक द्रव्ये तसेच इतर घटकांच्या साहाय्याने तयार केले जाते. चीज ॲनालॉग’ हे उत्पादन पनीरसदृश दिसत असले तरी ते पारंपरिक पनीर नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या आदेशानुसार महाराष्ट्रात ही मोहीम राबवली जात आहे. राज्यातील विविध हॉटेल्स, उपाहारगृहे आणि जलद खाद्यपदार्थ विक्री केंद्रांमध्ये मोठ्या प्रमाणावर ‘चीज ॲनालॉग’चा वापर होत असल्याचे निदर्शनास आले आहे.















