नंदुरबार तालुक्यातील आदिवासी बहुल टोकरतलाव गावात एचआयव्ही-एड्सबाबत जनजागृती करण्यासाठी रॅली व मार्गदर्शन कार्यक्रम उत्साहात पार पडला. हा उपक्रम नेहरू युवा केंद्राच्या विद्यार्थ्यांमार्फत तसेच आर.आर.सी. आदिवासी अकादमीचे समाजकार्य महाविद्यालय (एम.एस.डब्ल्यू. कॉलेज), नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समाजकार्य महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. स्मिता देशमुख होत्या. तर प्रमुख अतिथी म्हणून विश्वास सूर्यवंशी (जिल्हा कार्यक्रम अधिकारी, डापकू कार्यालय, जिल्हा रुग्णालय नंदुरबार) उपस्थित होते. आपल्या मार्गदर्शनपर भाषणात त्यांनी महिलांनी स्वतःच्या आरोग्याची नियमित काळजी घेणे, वेळोवेळी आरोग्य तपासणी करणे तसेच संसर्गजन्य आजारांपासून बचावासाठी जागरूक राहणे अत्यंत आवश्यक असल्याचे सांगितले.
यावेळी समुपदेशक सुभाष निकम यांनी उपस्थित ग्रामस्थांना एचआयव्ही-एड्स, गुप्तरोग, त्यांची लक्षणे, प्रतिबंध व उपचार याबाबत सविस्तर माहिती देत जनजागृती केली. तसेच समुपदेशक तेजल माळी यांनी वैयक्तिक स्वच्छतेचे महत्त्व, नियमित रक्त तपासणी तसेच गुप्तरोग प्रतिबंधाबाबत मार्गदर्शन केले.
दरम्यान, जागतिक महिला दिनानिमित्त गावातील आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या आरोग्य सेविका, अंगणवाडी कर्मचारी आणि आशा सेविका यांचा मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमास ग्रामस्थांसह जिल्हा परिषदेचे शिक्षक-शिक्षिका, ग्रामपंचायत सदस्य, महिला प्रतिनिधी तसेच समाजकार्य महाविद्यालयाचे प्राध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी समाजकार्य महाविद्यालयाचे RRC समन्वयक प्रा. चौरे यांचे विशेष सहकार्य लाभले. तसेच एस.एस.के. मॅनेजर गोपाल गाडीलोहार यांनी प्रास्ताविक केले, तर एस.एस.के. ओ.आर.डब्ल्यू. प्रतिभा माळी यांनी कार्यक्रमाच्या आयोजनासाठी परिश्रम घेतले.
या उपक्रमांतर्गत काढण्यात आलेल्या जनजागृती रॅलीमुळे गावात एचआयव्ही-एड्स प्रतिबंधाबाबत जागरूकता निर्माण झाली.
Maha Arogya IEC Bureau @mahahealthiec
#HIVAIDSawareness#WorldWomensDay#collectorofficenandurbar
















