नटसम्राट नाटकातून देशभर लोकप्रिय झालेले प्रसिद्ध अभिनेता डॉ.श्रीराम लागू हे एक बुद्धिमान, प्रतिभावंत, बहुगुणी, अष्टपैलू व्यक्तिमत्व होते. त्यांचा आवाज, लकब, संवादाची स्पष्टता आणि भूमिकेची खोली समजून अभिनय करण्याच्या पद्धतीमुळे नाट्यक्षेत्रात आणि मराठी, हिंदी चित्रपटसृष्टीत त्यांनी प्रचंड नावलौकिक मिळवला होता. नाट्यरसिकांवर आपल्या अभिनयाची अमिट छाप सोडणारे डॉ.लागू हे मूळ वैद्यकीय पदवीधारक (MBBS/MS) असताना अभिनयाच्या प्रचंड आवडीमुळे वयाच्या 42 व्या वर्षी पूर्णवेळ अभिनयाच्या क्षेत्रात पदार्पण करून खऱ्या अर्थाने नटसम्राट झाले. अतिशय स्पष्ट उच्चार आणि विशिष्ट संवाद शैलीमुळे त्यांची नाटके, चित्रपट, भाषणे प्रचंड लोकप्रिय झाली. विविधांगी वाचन, अनुभवामुळे त्यांनी कलेच्या क्षेत्रात राहूनही सामाजिक जाणीव आयुष्यभर तेवत ठेवली. त्यांचे सार्वजनिक वर्तन आणि व्यवहार नेहमी विज्ञानवादी, प्रागतिक विचारांचे होते. अगदी ब्राम्हण कुटुंबात जन्माला येऊनही त्यांनी वैयक्तिक आयुष्यात कधीच कर्मकांडाला थारा दिला नाही. उलट देवाला निवृत्त करण्याचा त्यांचा सल्ला असायचा. अशा काही भूमिकेमुळे ते बऱ्याचदा टीकेचे धनी झाले होते. झपाटून नाटक, चित्रपटात काम करणारे डॉ.लागू यांना रंगभूमीवर अभिनय करताना कधीच थकवा आला नाही. अभिनयाची नशाच अशी चढली होती की एक दिवसात तीन-तीन नाट्यप्रयोग करूनही त्यांना श्रमाची जाणीव व्हायची नाही. नटाने आपले शरीर एखाद्या क्रीडापटूप्रमाणे प्रमाणबद्ध, कार्यक्षम, लवचिक, डौलदार, चपळ आणि आपली बुद्धी ही सतत मनन, चिंतन, स्वतंत्र संचार करणारी ठेवली पाहिजे अशी त्यांची धारणा होती.
‘लमाण’ या त्याच्या नाट्यप्रवासावर आधारित (आत्मचरित्र म्हणून लिहिलेल्या) पुस्तकातून डॉ.लागू यांचा जीवनप्रवास समजून घेत असताना माणूस एवढा गुंतून जातो की, एकदा वाचन सुरू केले की, तो अधाशासारखा संपूर्ण वाचून काढल्याशिवाय स्वस्थ बसत नाही. सहजसोपी, ओघवती आणि खिळवून ठेवणारी खुमासदार मांडणी केल्याने प्रथितयश लेखकाचे लेखन असावे असे झाले आहे. त्यांचा मूळ स्वभाव अतिशय शांत, संयमी पण अभिनयात मात्र भूमिकेनुसार देहबोली, हालचाली, भूमिकेत विविधता असावी लागते. ‘लमाण’मधील विविध प्रसंग, संदर्भ, आठवणी आपल्याला तत्कालीन काळात घेऊन जाणाऱ्या आहेत. त्यामुळे त्यांच्या निवेदनासोबत आपणही कालसंगत आठवणीत रममाण होतो. काहीवेळा तर असे वाटते जसे काही आपण त्या घटनेचे साक्षीदार आहोत आणि ते सगळे आपल्या समोरच घडल्यासारखे वाटते. मला ‘लमाण’ वाचून त्याची प्रचिती आली म्हणून इतरांनाही त्यात सहभागी करून घ्यावे आणि आपल्याला मिळालेला आनंद दुसऱ्याना वाटून तो द्विगुणित करावा या सद्हेतूने त्यातले सारांश रूपाने आपल्या सोबत मांडत आहे. यातील प्रत्येक प्रसंगाची उत्कंठा वाढत जाते. परिणामी वाचकाला डॉ.लागू यांच्या सर्व कलाकृतीच्या पाठीमागे दडलेल्या, नंतर घडणाऱ्या घटनेतून त्यांचा प्रेरणादायी जीवनपट, सुखवस्तू जीवनशैलीने जगण्याची संधी असताना बेभरवशाच्या क्षेत्रातील संघर्षाची यशस्वी यात्रा समजल्याने कृतकृत्य झाल्याचा अनुभूती येते.
महात्मा गांधीच्या आंदोलनात सहभागी होणाऱ्या साताऱ्यातील आई आणि वडील (डॉक्टर) असलेल्या ब्राम्हण कुटुंबात डॉ.श्रीराम लागू यांचा 16 नोव्हेंबर 1927 रोजी जन्म झाला. सन 1946 ला मॅट्रिक झाल्यावर फर्ग्युसन कॉलेजमध्ये पुढील शिक्षणाला सुरुवात केली. शाळेत असताना एका नाटिकेत जबरदस्तीने काम करावे लागले होते. पुन्हा या धंद्यात पडायला नको असे वाटले होते पण घडले उलटेच. कारण कॉलेजकाळात नाटकांची चांगलीच आवड वाढली होती. म्हणूनच त्यांनी वैद्यकीय शिक्षण घेत असताना ‘इंटरकॉलेजिएट ड्रामॅटिक असोसिएशन’ नंतर ‘प्रोग्रेसिव्ह ड्रामॅटिक असोसिएशन’ नावाची नाट्यसंस्था (PDA) स्थापन केली. त्यांना भालबा केळकर नावाचा सर्जनशील, कलंदर, अवलिया दिग्दर्शक म्हणून मिळाला. संस्थेच्या माध्यमातून त्यांनी अनेक नवनवीन नाट्यप्रयोग सादर केले. उदा. उद्याचा संसार, दूरचे दिवे, बेबंदशाही, आंधळ्याची शाळा, जगन्नाथाचा रथ, वेड्याचं घर उन्हात, देवाचे मनोराज्य इ. जेव्हा त्यांना उच्च शिक्षणासाठी परदेशात जावे लागले तेव्हा मात्र त्यांना काही दिवस नाटकापासून दूर राहावे लागले. नाटकात जरी खंड पडला तरी वाचन आणि नाटकाबद्दलचे विचार सुरूच होते. पाश्चिमात्य अभिनेते अलेक गिनेस आणि लॉरेन्स ऑलिव्हिए यांच्या अभिनयाने ते प्रचंड प्रभावित झाले होते. अभिनयातील बारकावे हेरून जागा कशी शोधावी, भूमिकेवर पकड कशी मिळवायची याचे तंत्र ते जाणून घेत होते. त्यांच्या मते कुठल्याही कलाकृतीचा उद्देश लोकरंजन किंवा लोकशिक्षण असूच शकत नाही. तर माणसाला आत्मशोध घ्यायला लावणे हेच कलाकृतीचे एकमेव कार्य असले पाहिजे. तसेच केवळ करमणूकही कलाकृतीचा उद्देश नसतो तर माणसाच्या जाणिवेच्या कक्षा अधिकाधिक रुंदाव्यात. त्या समृद्ध होऊन ‘मी’चे स्वरूप उलगडत जावे म्हणून नाटक करायचे. नटाने भूमिका जगायची नसते तर ती जगण्याचा बेमालूम भास निर्माण करायचा असतो. त्यासाठी भूमिकेची समज आणि तंत्रावर संपूर्ण हुकूमत आसवी लागते.
पिंजरा, सामना, सिंहासन यासारख्या दर्जेदार मराठी चित्रपटांमधील डॉ.लागू यांचा अभिनय अव्वल दर्जाचा आणि कसदार कलाकाराची क्षमता सिद्ध करणारा आहे. घरोंदा या हिंदी चित्रपटातील अभिनयासाठी त्यांना मानाचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. (मुख्य सहायक अभिनेता-1978) तसेच त्यांच्या योगदानाबद्दल भारत सरकारच्या ‘पद्मश्री’ या पुरस्कारानेही त्यांना सन्मानित करण्यात आले. त्यांनी अनेक मराठी तसेच हिंदी चित्रपटांत विविधांगी भूमिका साकारून प्रसिद्ध व्यवसायिक अभिनेता अशी आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली. जसे नाटक, चित्रपट यांची संख्या वाढत होती तसेच वेगवेगळ्या क्षेत्रातील दिग्गजांसोबत त्यांच्या भेटीगाठी होऊ लागल्या. एकदा त्यांना भेटायला बंगालचे ख्यातनाम रंगकर्मी शंभू मित्र आले होते. त्यांच्यात आपसात प्रदीर्घ चर्चा झाली. त्यात त्यांना केवळ दोनच वाक्य मंत्रासारखे वाटले आणि डॉ.लागू यांनी ते कायम हृदयात कोरून ठेवले. त्यातले एक वाक्य होते ‘An actor has to be an athlete philosopher’ तर दुसरे होते ‘You are the instrument and you are the player’ या दोन वाक्यांनी त्यांना आतून-बाहेरून बदलून टाकले. कलावंताने शारीरिक कसरतपटू आणि तत्वज्ञ असले पाहिजे, यावर त्यांचे शिक्कामोर्तब झाले. महाकवी कालिदास म्हणतात त्याप्रमाणे, ‘नाटक हा डोळ्यांनी आणि कानांनी करण्याचा यज्ञ आहे’, याच जाणीवेतून त्यांनी शेवटपर्यंत रंगभूमीची सर्वोपरी सेवा यज्ञ केला. नाट्य अभिनय, लेखन, दिग्दर्शन, निर्माता, व्याख्याता अशा सगळ्याच बाबतीत त्यांनी आपली चुणूक दाखवली. यातूनच अडीच हजार वर्षापूर्वी लिहलेल्या ‘अँटिगनी’ या ग्रीक नाटकाचे मराठी भाषांतर करून त्याचा छबीलदासमध्ये प्रयोग करण्याचे धाडस त्यांनी केले. असेच धाडस त्यांनी विजय तेंडुलकर यांचे गिधाडे हे नाटक करूनसुद्धा दाखवले होते. पार सेन्सॉर बोर्डापर्यंत त्यांना भांडावे लागले होते. त्यामुळे वादग्रस्त कलाकृती आणि डॉ.लागू यांचे जणू समीकरणच झाले होते. काही नाट्य लेखक आणि दिग्दर्शक त्यांना सेन्सॉरच्या लढाईसाठी जाणीवपूर्वक मध्यवर्ती भूमिकेसाठी निवडत असत.
सामाजिक कृतज्ञता निधी : डॉ.लागू यांची जगण्याची काही तत्वे होती ती त्यांनी आयुष्यभर जपलीदेखील म्हणून ते कलावंत म्हणून जेवढे श्रेष्ट होते तितकेच ते सामाजिक भान जपणारे सहृदयी सुद्धा होते. त्यांचे सामाजिक कार्य नाटक, चित्रपट करत असताना तसे सुरूच होते. परंतु तळागाळातल्या समाजासाठी काम करणाऱ्या अनेक सामाजिक कार्यकर्त्याची होणारी आर्थिक ओढतान ते पाहत होते. म्हणून महाराष्ट्रातल्या सामाजिक चळवळीतील निस्वार्थी कार्यकर्त्यासाठी काहीतरी मदत करावी तसेच त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी निधी जमा करण्याचे ठरले. सुरुवातीला आर्थिक स्थिती चांगली असणाऱ्यांकडून त्यांनी देणगी स्वरूपात मदत मागितली परंतु ते काही त्यांच्या मनाला पटले नाही. मग नरेंद्र दाभोळकर, निळूभाऊ फुले, सदाशिव अमरापूरकर या मंडळींशी चर्चा करून निवडक कलाकार घेऊन आचार्य अत्रे यांचे ‘लग्नाची बेडी’ या नाटकाचे प्रयोग निधी जमवण्यासाठी करायचे ठरले. 4 फेबुवारी 1987 पासून पुढे सलग एकवीस दिवस त्यांनी महाराष्ट्र दौरा केला. हिंदीमधील अभिनेत्री तनुजादेखील यात सहभागी होती. यातून त्यावेळी खर्चवजा 25 लाख रुपये जमा झाले. यातूनच महाराष्ट्रातल्या निरनिराळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या 25 सामाजिक कार्यकर्त्यांना दरमहा 500 रुपये मानधन सुरू करता आले. खूप वेगळे आणि चांगले सामाजिक कार्य यातून घडले. कलेच्या क्षेत्रात राहूनही समाज परिवर्तनासाठी डॉ.लागू यांनी कृतज्ञ राहून सामाजिक भान जपले. कृतार्थ आयुष्य जगले आणि कलाक्षेत्रात एक आदर्श कलावंत, सच्चा माणूस म्हणून संपूर्ण वाटचाल केली. त्यांचा आदर्श नाट्यकला प्रवास येणाऱ्या अनेक नवोदित कलाकारांना प्रोत्साहित करत राहील. डॉ.लागू यांच्या मते व्यक्तिमत्व संपन्न नसेल तर अभिनय समर्थ होऊ शकत नाही. ‘अंतकरणाच्या गाभ्यापासून कराव्याशा वाटणाऱ्या एखाद्या गोष्टीचा आयुष्यभर पाठपुरावा करता येण्याचे भाग्य लाभणे यातले सुख ‘जवापडे’ असले तरी त्या तीळभर सुखात पर्वताएवढ्या दु:खाला शरमेने मान खाली घालायला लावण्याचे सामर्थ्य असते हा केवढा मोठा दिलासा आहे.’ डॉ.श्रीराम लागू अभिनेता म्हणून स्वत:ला यकिंचित सामान्य कलाकार समजून नाटककाराचा माल प्रेक्षकाकडे नेऊन टाकणारा ‘लमाण’ समजत होते. यातूनच त्यांचा मोठेपणा, नम्रता आपसूक दिसून येत असे. त्यांचा अभिनय वारसा आम्हाला कायम प्रेरित करीत राहील. अशा प्रतिभावान, गुणी, निगर्वी, प्रागतिक विचाराच्या, बुद्धिमान, विचारवंत कलाकारास नाट्यसृष्टी कदापि विसरणार नाही. वैद्यकीय क्षेत्रातील काम, नाट्यकला, अभिनय, वाचन, संवाद, व्याख्यान, सामाजिक चळवळीत सक्रिय राहिलेल्या ज्येष्ठ अभिनेते स्मृतिशेष डॉ.श्रीराम लागू यांचा संपूर्ण नाट्यजीवनप्रवास ‘लमाण’मध्ये मांडलेला आहे.
















