Home शेती शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी मुबलक प्रमाणात बियाणे व खते उपलब्ध करून द्यावे – मंत्री...

शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी मुबलक प्रमाणात बियाणे व खते उपलब्ध करून द्यावे – मंत्री छगन भुजबळ

1
Seeds and fertilizers should be made available to farmers in ample quantities for the Kharif season – Minister Chhagan Bhujbal.

नाशिक: शेतकऱ्यांची खरिपाची कामे वेगाने सुरू झाली आहे. शेतकऱ्यांना पेरणीसाठी आवश्यक बियाणे व खते मुबलक प्रमाणात उपलब्ध करून द्यावे, अशा सूचना अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिल्या.

येवला येथील संपर्क कार्यालयात आयोजित विविध विभागांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी येवला उपविभागीय अधिकारी बाबासाहेब गाढवे, निफाडचे तहसीलदार विशाल नाईकवाडे, तहसीलदार आबा महाजन, नगरपालिकेचे मुख्याधिकारी तुषार आहेर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सुमेरसिंह पाकळ, गटविकास अधिकारी संदीप वायाळ, महाराष्ट्र जल जीवन मिशन, सिन्नर उपअभियंता श्रद्धा मोरे, तालुका कृषी अधिकारी शुभम बेरड यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

मंत्री छगन भुजबळ म्हणाले, खरिप हंगामात विक्रेत्यांकडून शेतकऱ्यांना बियाणे रास्त दराने विक्री होईल तसेच खताचा बफर स्टॉक करून ठेवावा आणि खताची लिंकिंग होणार नाही याबाबत काटेकोर दक्षता घेण्यात यावी.

तालुक्यात पाऊस सुरू झाला असून पाणी टंचाईच्या दृष्टीने आवश्यक त्याठिकाणी पाण्याचे टँकर सुरू ठेवावेत. येवला, निफाड व लासलगाव तालुक्यातील पीक कर्ज वाटपाचे लक्षांक पूर्ण करावे. मागणीनुसार पात्र शेतकऱ्यांना पीक कर्ज द्यावे, अशा सूचना मंत्री भुजबळ यांनी दिल्या.

जल जीवन मिशन कार्यक्रमअंतर्गत पाणीपुरवठा योजनांचा आढावा घेताना मंत्री भुजबळ म्हणाले, येवला ३८ गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेतील समाविष्ट गावांची वीजबिल दरवाढीसाठी ग्रामसेवकांची बैठक घेऊन सूचित करावे. विंचूर लासलगावसह १६ गांवे प्रादेशिक पाणीपुरवठा सुधारीत योजनेतील कामांना गती देऊन कालवा गळतीची कामे पाऊस उघडल्यानंतर तातडीने पूर्ण करावीत. मुख्यमंत्री बळीराजा पाणंद योजनेत प्राप्त निधीनुसार आवश्यक कामांना प्राधान्य द्यावे. लासलगाव-विंचूर रस्ता काँक्रीटीकरण व चौपदरीकरण कामे, भरवस फाटा ते कोपरगाव रस्ता, पिंपळस ते येवला चौपदरी काँक्रीट रोड इत्यादी कामे सुरू करण्यात यावे. लासलगाव विंचूर चौपदरी सह खेडलेझुंगे कॉंक्रीट रोडची कामे गुणवत्तापूर्ण होतील यासाठी दक्ष राहावे. जल जीवन मिशन योजनेतील उर्वरित कामे पूर्ण करावीत, अशा सूचना मंत्री भुजबळ यांनी दिल्या.

मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमास ८ ऑगस्टपर्यंत मुततवाढ मिळाली आहे. येवला शहरासह मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरिक्षण विहित मुदतीत शंभर टक्के होण्याच्या दृष्टीने गृहभेटी, शिबिरे व जनजागृतीसाठी विशेष मोहीम राबविण्यात यावी.

ई-श्रम कार्ड नोंदणी कामकाज, कामगारांना भांडे वाटप योजना, आत्मा योजनेची मतदारसंघातील अंमलबजावणी, प्रधानमंत्री कुसुम सोलर योजनेत लाभ घेतलेल्या एकूण लाभार्थ्यांबाबत येवला तालुक्यातील सद्यस्थिती, सामाजिक अर्थसहाय्यच्या विविध योजनांमधील अनुदान वाटप याबाबतचा आढावा मंत्री भुजबळ यांनी घेतला.

यावेळी कृषी विभागामार्फत सहायक कृषी अधिकारी संजय मोरे यांना शासकीय कामासाठी लॅपटॉपचे वितरण मंत्री भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी तालुका कृषी अधिकारी शुभम बेरड उपस्थित होते.