Home लाईफस्टाईल शैक्षणिक आदिवासी विद्यार्थ्यांसाठी ‘नीट’ व ‘जेईई’ प्रशिक्षणाची सुवर्णसंधी

आदिवासी विद्यार्थ्यांसाठी ‘नीट’ व ‘जेईई’ प्रशिक्षणाची सुवर्णसंधी

0
आदिवासी विद्यार्थ्यांसाठी ‘नीट’ व ‘जेईई’ प्रशिक्षणाची सुवर्णसंधी
Golden opportunity for 'NEET' and 'JEE' training for tribal students

(नंदुरबार) आदिवासी विकास विभागांतर्गत शासकीय व अनुदानित आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांसाठी अभियांत्रिकी जेईई/सीईटी (JEE/CET) आणि वैद्यकीय नीट (NEET) प्रवेश परीक्षांच्या तयारीसाठी नामवंत खासगी संस्थांमार्फत दोन वर्षांचे निवासी प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत असून पात्र विद्यार्थ्यांकडून 15 फेब्रुवारी 2026 पर्यंत अर्ज सादर करावे असे आवाहन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी चंद्रकांत पवार यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

या योजनेमुळे राज्यातील दुर्गम भागातील अनुसूचित जमातीचे विद्यार्थी देखील शासकीय वैद्यकीय महाविद्यालये, अभियांत्रिकी महाविद्यालये किंवा आयआयटी (IIT) सारख्या नामांकित संस्थांमध्ये प्रवेश घेऊ शकतील. ही योजना दोन वर्षांची असून, नामवंत खासगी प्रशिक्षण संस्थेच्या साहाय्याने मार्गदर्शन केले जाईल. सन 2026-27 या शैक्षणिक वर्षात इयत्ता 10 वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना नीट (NEET) व सीईटी/जेईई (CET/JEE) या योजनेअंतर्गत इ. 11 वीत प्रवेश दिला जाईल.

प्रवेशासाठी एकूण चार केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत.

• नाशिक येथील शासकीय आश्रमशाळा-मुढेंगांव / बोपेगांव (नाशिक प्रकल्प) सीईटी/जेईईसाठी 50 मुले व नीटसाठी- 50 मुले.

• ठाणे येथील एकलव्य शेडेंगांव (शहापूर प्रकल्प) सीईटी/जेईईसाठी 50 मुली व नीटसाठी- 50 मुली.

• अमरावती येथील शासकीय आश्रमशाळा चिंचघाट (पांढरकवडा प्रकल्प) सीईटी/जेईईसाठी 50 मुले व नीटसाठी- 50 मुले.

• नागपूर येथील शासकीय आश्रमशाळा सिंधीविहीर (वर्धा प्रकल्प) सीईटी/जेईईसाठी 50 मुली व नीटसाठी- 50 मुली.

पात्रता निकष:

• विद्यार्थी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.

• अनुसूची जमातीच्या यादीतील असावा आणि प्रवेशावेळी जातीचा दाखला बंधनकारक आहे

• विद्यार्थ्यांच्या पालकांचे उत्पन्न रुपये 8 लाखांपेक्षा कमी असावे.

• या परीक्षेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थी त्याच शैक्षणिक वर्षात इ. 10 वी उत्तीर्ण असावा.

अर्ज करण्याची प्रक्रिया:

सर्व शासकीय, अनुदानित आश्रमशाळा, एकलव्य निवासी शाळा आणि मान्यताप्राप्त माध्यमिक शाळांमधील अनुसूचित जमातीचे विद्यार्थी, जे मार्च 2026 च्या इ. 10 वीच्या परीक्षेत बसले आहेत आणि नीट (NEET) व सीईटी/जेईई (CET/JEE) प्रशिक्षणासाठी इच्छुक आहेत, त्यांनी आपले अर्ज 15 फेब्रूवारी, 2026 पर्यंत प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, नंदुरबार येथे शिक्षण विभागात जमा करावेत, असेही प्रकल्प अधिकारी श्री. पवार, यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here