विमानतळाच्या विस्तारीकरणामुळे औद्योगिक विकासात नाशिक घेणार भरारी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
नाशिक: विमान प्रवास आता चैनीची नव्हे, तर आवश्यक गरज झाली आहे. विमानतळाच्या विस्तारीकरणामुळे नाशिकच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळणार आहे. त्यामुळे नाशिक जिल्हा औद्योगिक विकासात भरारी घेईल, असा विश्वास राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
नाशिक महाराष्ट्र पायाभूत सुविधा विकास महामंडळ मर्यादित ओझर विमानतळ नवीन एकात्मिक टर्मिनल इमारतीचे बांधकाम व विस्तारीकरणाचे भूमिपूजन आज सायंकाळी ओझर विमानतळ येथे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन, शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह भोसले, अन्न व औषध प्रशासन, विशेष साहाय्य मंत्री नरहरी झिरवाळ, खासदार भास्कर भगरे, खासदार राजाभाऊ वाजे, आमदार सीमा हिरे, आमदार दिलीप बनकर, आमदार सरोज अहिरे, आमदार नितीन पवार, महापौर हिमगौरी आडके, उपमहापौर विलास शिंदे, विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, विशेष पोलिस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे, कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह, महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री, महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, हिंदुस्थान एरोनॉटिक्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी साकेत चतुर्वेदी, जानोरीचे सरपंच सुभाष नेहरे आदी उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी श्री. प्रसाद आणि एचएएलचे संजय चौधरी यांनी सामंजस्य कराराचे आदान प्रदान केले.मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सर्वसामान्य नागरिकाला विमान प्रवास करता यावा यासाठी देशातील महत्वाच्या शहरात उड्डाण योजनेतंर्गत विमान सेवा सुरू करण्याचा संकल्प केला. त्यात नाशिकच्या विमानतळाचा समावेश होता. या विमानतळाच्या विस्तारीकरणामुळे प्रवाशी क्षमता वाढणार आहे. आगामी नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त आठ ते दहापट भाविक येणार आहेत. त्यांना अधिक सुविधा देण्यासाठी विमानतळाचे विस्तारीकरण करण्यात येत आहेत. विस्तारीकरणामुळे प्रवाशी क्षमता मोठ्या प्रमाणात वाढणार आहेत. कृषी क्षेत्रात नाशिक अग्रेसर जिल्हा असल्याने निर्यातीला तसेच औद्योगिकीकरणाला चालना मिळणार आहे.

