दहिसर ट्रान्सपोर्ट हबच्या ब्लास्टिंगवर कारवाईचे निर्देश; इमारतींच्या नुकसानीची होणार तपासणी
ब्लास्टिंग करणाऱ्या कंपनीकडून निर्धारित वेळा व अन्य सुरक्षा अटींचे यापूर्वी उल्लंघन झाले असल्यास त्याची नोंद घेऊन संबंधित कंत्राटदारावर कारवाई करावी. तसेच अधिक सुरक्षित व प्रगत ब्लास्टिंग तंत्रज्ञानाचा वापर करण्याबाबतही विचार करावा, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.
ब्लास्टिंगमुळे इमारतींना झालेल्या नुकसानीच्या तक्रारींची तज्ज्ञांमार्फत तपासणी करून स्ट्रक्चरल ऑडिटचा अहवाल तयार करावा. तसेच ब्लास्टिंगमुळे नुकसान झाल्याचे स्पष्ट झाल्यास संबंधितांकडून नुकसानभरपाईची कार्यवाही करावी, असेही पालकमंत्री ॲड. शेलार यांनी सांगितले.
ट्रान्सपोर्ट हबच्या कामासंदर्भात मंत्रालयात झालेल्या बैठकीत आमदार प्रकाश सुर्वे, आमदार मनिषा चौधरी, मुंबई उपनगर जिल्हाधिकारी सौरभ कटियार, मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त प्राजक्ता लवंगारे यांच्यासह पर्यावरण, पोलीस विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

