महाराष्ट्रातील प्रारुप मतदार याद्या प्रसिद्ध; ७ कोटी ७१ लाख मतदारांचा समावेश

भारत निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल पुनरिक्षण- २०२६ अंतर्गत महाराष्ट्रातील सर्व २८८ विधानसभा मतदारसंघांच्या प्रारुप मतदार याद्या ३१ ऑगस्ट २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. या प्रारुप याद्या भारत निवडणूक आयोगाच्या ‘व्होटर सर्व्हिस पोर्टल’ (https://voters.eci.gov.in/), मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र यांच्या (https://ceoelection.maharashtra.gov.in/ceo/) संकेतस्थळावर तसेच संबंधित जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांच्या संकेतस्थळावर नागरिकांसाठी उपलब्ध आहेत.
महाराष्ट्रातील प्रारुप मतदार याद्या प्रसिद्ध; ७ कोटी ७१ लाख मतदारांचा समावेश
Draft electoral rolls for Maharashtra published; includes 7.71 crore voters.

विशेष सखोल पुनरिक्षणापूर्वी राज्यात एकूण ९ कोटी ७८ लाख ५४ हजार ४९ मतदार होते. त्यापैकी ७ कोटी ७१ लाख ६५ हजार ५६२ मतदार (७८.८६ टक्के) प्रारुप मतदार यादीत समाविष्ट करण्यात आले आहेत.
प्रारुप मतदार यादीत नाव आहे किंवा नाही, याची पडताळणी मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र यांच्या संकेतस्थळावरील ‘Search Your Name in Draft E-Roll of SIR 2026’ या सुविधेद्वारे करता येणार आहे. यामध्ये ईपिक क्रमांक, वैयक्तिक तपशील किंवा मोबाईल क्रमांकाद्वारे नाव शोधण्याची सुविधा उपलब्ध आहे.
जुन्या मतदार यादीतील २ कोटी ६ लाख ८८ हजार ४८७ (२१.१४ टक्के) मतदारांचा प्रारुप यादीत समावेश होऊ शकलेला नाही. संबंधित गणना प्रपत्र प्राप्त न झाल्याने गैरहजर, स्थलांतरित, मृत, अन्यत्र नाव नोंदणी झालेली (दुबार) तसेच इतर कारणांमुळे ही नावे प्रारुप यादीत समाविष्ट झालेली नाहीत.
अशा मतदारांची एसडीडी(ॲब्सेंट, शिफ्टेड, डेड, डुप्लिकेट) यादी एसआयआर2026 देखील मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र यांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. या सुविधेद्वारे मतदारांना ईपिक क्रमांकाच्या आधारे आपले नाव शोधता येणार असून मतदान केंद्रनिहाय एएसडीडी यादी डाउनलोड करण्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे.
प्रारुप मतदार यादीत नाव समाविष्ट न झालेल्या पात्र मतदारांना तसेच १ ऑक्टोबर २०२६ रोजी किंवा त्यापूर्वी १८ वर्षे पूर्ण करणाऱ्या नवमतदारांना मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी प्रपत्र-6 व घोषणापत्र भरता येणार आहे. भारत निवडणूक आयोगाच्या व्होटर सर्व्हिस पोर्टलवर ऑनलाइन किंवा संबंधित मतदार नोंदणी अधिकाऱ्याकडे ऑफलाइन पद्धतीने अर्ज करता येईल. योग्य पडताळणीनंतर पात्र मतदारांची नावे अंतिम मतदार यादीत समाविष्ट करण्यात येतील, असे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने कळविले आहे.

जाहिरात
Dev-Mogra-Nandurbar-Ad-300x250