
(नंदुरबार) तोरणमाळ येथील तोरणादेवी जंगल प्रोड्युसर कंपनी आणि लेगापाणी येथील सामूहिक वन संसाधन व व्यवस्थापन समिती (CFRMC) यांच्या संयुक्त प्रयत्नातून बांबू विक्रीचा दुसरा प्रयोग यशस्वीरीत्या पार पडला.
या उपक्रमांतर्गत Centre for Indian Bamboo Resource and Technology वांसदा, गुजरात येथे एकूण 1010 बांबूंची विक्री करण्यात आली. या विक्रीला समाधानकारक दर मिळाल्याने स्थानिक स्तरावर आनंद आणि समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या उपक्रमाचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे, केवळ बांबू विक्रीपुरते मर्यादित न राहता लेगापाणी गावातील सुमारे 20 कुटुंबांतील 40 ते 45 नागरिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या. गावातच रोजगार निर्मिती झाल्याने ग्रामस्थांमध्ये उत्साह असून, यामुळे स्थलांतराला आळा बसण्यास मदत होणार आहे.
याशिवाय, बांबू व्यवस्थापनासोबतच आगामी काळात बिहार पॅटर्न वृक्ष लागवड योजनेअंतर्गत फळझाडांची लागवड तसेच मनरेगा अंतर्गत बांबू लागवड करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या माध्यमातून गावाच्या सर्वांगीण विकासाला अधिक चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
विशेष म्हणजे, हा संपूर्ण उपक्रम महिलांच्या नेतृत्वाखालील कंपनीमार्फत राबविण्यात येत असून ग्रामीण भागातील महिला सशक्तीकरण, नेतृत्व आणि स्वावलंबनाचे प्रेरणादायी उदाहरण ठरत आहे.
हा उपक्रम इंडियन स्कूल ऑफ बिझनेस (ISB), हैदराबाद आणि जिल्हाधिकारी कार्यालय, नंदुरबार यांच्या संयुक्त सहकार्याने प्रभावीपणे राबविण्यात येत आहे.
ग्रामीण विकास, स्थानिक रोजगार निर्मिती आणि महिला नेतृत्वाच्या बळावर लेगापाणी गाव विकासाची नवी दिशा निश्चित करत आहे.
#Nandurbar#BambooDevelopment#WomenEmpowerment#RuralEmployment#SustainableDevelopment#LocalLivelihood#ForestManagement#CFRMC#TribalDevelopment#DistrictAdministration#AtmanirbharBharat#WomenLeadership#GreenEconomy















