Home महाराष्ट्र ‘मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता’साठी आता रुग्णालयामार्फत अर्ज ऑनलाइन प्रणालीमुळे ८ तासात मंजुरी

‘मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता’साठी आता रुग्णालयामार्फत अर्ज ऑनलाइन प्रणालीमुळे ८ तासात मंजुरी

0
Applications for ‘Chief Minister’s Medical Assistance’ through hospitals can now be approved within 8 hours thanks to the online system

नागपूर: मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीतून मदत मिळविण्यासाठी रुग्णांना हेलपाटे पडू नये व तातडीने उपचार मिळावे यासाठी म्हणून मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षात नवीन ऑनलाइन प्रणाली सुरू होणार असून, त्यामुळे ८ तासातच मदतीला मंजुरी मिळू शकणार आहे. यात रुग्णाऐवजी रुगणालायामार्फत या योजनेसाठी अर्ज सादर करता येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २० एप्रिल रोजी या प्रणालीचे लोकार्पण करण्यात आले.

राज्यातील गरजू आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील रुग्णांना उपचारासाठी आर्थिक साह्य मिळावे या उद्देशाने नागपुरात मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष स्थापन करण्यात आला आहे. या योजेनेतून मदत मिळविण्यासाठी आता पर्यंत रुग्णाचे नातेवाईकच कागदपत्रांची जुळवाजुळव करून अर्ज करीत होते. मात्र मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाने आता ऑनलाइन प्रणाली सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे अर्ज मंजुरीची प्रक्रिया आठ तासात पूर्ण होणार आहे. विशेष म्हणजे रुग्णाऐवजी थेट कक्षाशी संलग्न असणाऱ्या रुग्णालयामार्फत अर्ज सादर होणार आहे. त्यामुळे रुग्णाला कोणत्याही प्रकारचा अर्ज भरावा लागणार नाही. तसेच उपचार प्रक्रियेला गती मिळू शकेल.

गेल्या काही वर्षांपासून या कक्षामध्ये रुग्णांना सोईचे होतील असे बदल करणे सुरू आहेत. नवीन ऑनलाइन प्रणाली त्याचाच एक भाग आहे. रुग्णाने रुग्णालयात सर्व रीतसर कागदपत्रे दिल्यानंतर रुग्णालय प्रशासन त्याचा अर्ज मुख्यमंत्री सहायता निधी कार्यालयाकडे मंजुरीसाठी पाठविणार आहे. त्या ठिकाणी नियमानुसार सर्व  कागदपत्रे असल्यास अर्ज मंजुरीची प्रक्रिया कार्यालयीन आठ तासात पूर्ण केली जाईल. त्यामुळे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना मोठा दिलासा मिळू शकणार आहे.

१ एप्रिल २०२५ ते ३१ मार्च २०२६ या आर्थिक वर्षात राज्यातील तब्बल ४० हजार ७७६ रुग्णांना ३३३ कोटी ६ लाख ८१ हजार ५०० रुपयांची वैद्यकीय मदत करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे  मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष, बीपीसीएल फाऊंडेशन व टाटा मेमोरियल सेंटर यांच्यात बालकांच्या कर्करोग उपचारासाठी सामंजस्य करार करण्यात आला आहे. त्यामुळे सीएसआर अंतगर्त विशेष निधी उपलब्ध होऊन गरजू रुग्णांना दर्जेदार उपचार मिळणार आहेत.

नागपूर जिल्ह्यामध्ये मागील वर्षी नमो नेत्र संजीवनी शिबिर, आरोग्याचा श्री गणेशा व इतर आरोग्य शिबिर अशी एकूण ७४७ शिबिरे आयोजित करण्यात आली. त्याचा लाभ ५३,४२२ रुग्णांनी घेतला.

रुग्णांना वेळेत उपचार मिळावेत यासाठी यासाठी ही ऑनलाइन प्रणाली विकसित करण्यात येत आली आहे. त्यामुळे आता अर्ज मंजुरीची प्रक्रिया जलद होऊन रुग्णांना मोठा दिलासा मिळेल. तसेच वेळेवर कागदपत्र उपलब्ध नसलेल्या रुग्णांकरिता मुख्यमंत्री सचिवालय (हैद्राबाद हाऊस सिव्हिल लाइन्स नागपूर) येथे ऑफलाईन स्वरूपात पूर्वीप्रमाणे व्यवस्था सुरू राहणार आहे. सदर नवीन प्रणाली राज्यभरात प्रभाविपणे राबविली जाणार असल्याचे नागपूर येथील मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाचे कक्ष प्रमुख व सदस्य सचिव डॉ. सागर पांडे यांनी म्हटले आहे.