तुटलेल्या तारा, ट्रान्सफॉर्मर व विजेच्या खांबांपासून सावध राहा

नंदुरबार : पावसाळ्याला सुरुवात होताच वादळी वारे, विजांचा कडकडाट आणि मुसळधार पावसामुळे विद्युत दुर्घटनांचा धोका वाढतो. तुटलेल्या विजेच्या तारा, विजेचे खांब, ट्रान्सफॉर्मर, फिडर पिलर तसेच शॉर्टसर्किटमुळे अपघात होऊन जीवितहानी होण्याची शक्यता असते. त्यामुळे विद्युत यंत्रणेपासून दूर राहून नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन महावितरणचे मुख्य अभियंता आय.ए. मुलाणी यांनी केले आहे.
तुटलेल्या तारा, ट्रान्सफॉर्मर व विजेच्या खांबांपासून सावध राहा

महावितरणने दिलेल्या माहितीनुसार, अतिवृष्टी आणि वादळामुळे विजेच्या तारा तुटणे, खांब कोसळणे, ट्रान्सफॉर्मरमध्ये ठिणग्या पडणे किंवा शॉर्टसर्किट होणे अशा घटना घडू शकतात. अशा वेळी लोंबकळणाऱ्या किंवा तुटलेल्या तारांना स्पर्श करू नये. ट्रान्सफॉर्मर, फिडर पिलर किंवा विजेच्या खांबाजवळ शॉर्टसर्किट झाल्यास त्या परिसरात जाणे टाळून तातडीने महावितरणला माहिती द्यावी.

पावसाळ्यात घरातील ओलसर विद्युत उपकरणे, शेती पंपावरील स्विचबोर्ड तसेच उघड्या विद्युत तारा यांच्यामुळेही अपघात होऊ शकतात. त्यामुळे नागरिकांनी घर, सोसायटी आणि परिसरातील विद्युत यंत्रणा सुरक्षित असल्याची खात्री करून घ्यावी. पत्र्याच्या घरांमध्ये राहणाऱ्यांनीही आवश्यक सुरक्षात्मक उपाययोजना कराव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.

विजेच्या खांबांना जनावरे बांधू नयेत किंवा दुचाकी टेकवून ठेवू नयेत, तसेच पूरस्थितीत नदीकाठच्या भागात विशेष दक्षता घ्यावी. भूमिगत वीजवाहिन्यांमध्ये पाणी शिरणे, झाडे कोसळणे किंवा वीज पडल्याने वीजपुरवठा खंडित होण्याबरोबरच जीवितास धोका निर्माण होऊ शकतो.

अतिवृष्टी, वादळ किंवा इतर नैसर्गिक आपत्तीमुळे वीजवाहिन्या तुटणे, खांब कोसळणे अथवा विद्युत दुर्घटनेची शक्यता निर्माण झाल्यास अथवा कोणतीही धोकादायक घटना आढळल्यास नागरिकांनी त्याची माहिती महावितरणच्या मध्यवर्ती ग्राहक सेवा केंद्राशी 1912 या हेल्पलाईन क्रमांकावर किंवा 1800-212-3435 व 1800-233-3435 या टोल-फ्री क्रमांकांवर किंवा स्थानिक नियंत्रण कक्षाच्या 7798120155 (जळगाव मंडल), 7875766763 (धुळे मंडल) व 7875554543 (नंदुरबार मंडल) या क्रमांकांवर तात्काळ द्यावी, असे आवाहन महावितरणने केले आहे.

जाहिरात
Dev-Mogra-Nandurbar-Ad-300x250