
दापोली(प्रतिनिधी):-शिक्षण हा प्रत्येक विद्यार्थ्याचा मूलभूत अधिकार असून आर्थिक परिस्थिती कोणाच्याही शिक्षणाच्या आड येऊ नये, या उदात्त सामाजिक भावनेतून सह्याद्री कुणबी संघ, पुणे शहर (महाराष्ट्र) यांच्या खेड – दापोली-चिपळूण- संगमेश्वर संस्थेमार्फत गरजू विद्यार्थ्यांसाठी मोफत सायकल वाटपाचा स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत दापोली तालुक्यातील न्यू इंग्लिश स्कूल, दमामे येथील कु. सुरज सचिन भेरे (दमामे गुरववाडी) या विद्यार्थ्याला मोफत सायकल प्रदान करण्यात आली. दुर्गम भागातील अनेक विद्यार्थ्यांना दररोज अनेक किलोमीटर अंतर पायी चालत शाळेत जावे लागते. त्यामुळे त्यांचा मौल्यवान वेळ आणि शारीरिक श्रम मोठ्या प्रमाणात खर्च होतात. अनेक वेळा वाहतुकीच्या अडचणींमुळे विद्यार्थ्यांच्या नियमित उपस्थितीवर परिणाम होतो. या सर्व बाबींचा विचार करून विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रवास अधिक सुलभ, सुरक्षित आणि प्रेरणादायी व्हावा, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. सायकल मिळाल्यामुळे संबंधित विद्यार्थ्याचा शाळेत ये-जा करण्याचा वेळ वाचणार असून, त्याचा अधिक वेळ अभ्यास, क्रीडा आणि इतर शैक्षणिक उपक्रमांसाठी उपयोग होणार आहे. तसेच नियमित शाळेत उपस्थित राहण्यास प्रोत्साहन मिळून शिक्षणाची गुणवत्ता वाढण्यास मदत होईल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला. सह्याद्री कुणबी संघ हा समाजातील गरजू, होतकरू आणि गुणवंत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी सातत्याने विविध उपक्रम राबवत आहे. मोफत सायकल वाटप, शैक्षणिक साहित्य वितरण, विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी आर्थिक मदत, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, तसेच विविध सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रमांच्या माध्यमातून संस्था समाजाप्रती आपली बांधिलकी जपत आहे. अनेक विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च उचलून त्यांचे भविष्य घडविण्याचे मोलाचे कार्य संस्था सातत्याने करत आहे. या समाजोपयोगी उपक्रमासाठी संस्थेच्या सर्वच पदाधिकारी यांनी मोलाचे सहकार्य केले. त्यांच्या सामाजिक जाणिवेमुळे आणि सहकार्यामुळे गरजू विद्यार्थ्याला शिक्षणासाठी आवश्यक असलेली महत्त्वाची सुविधा उपलब्ध झाली. या उपक्रमाबद्दल विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि ग्रामस्थांनी सह्याद्री कुणबी संघ तसेच सर्व सहकार्यकर्त्यांचे मनःपूर्वक आभार मानले. समाजातील दानशूर व्यक्तींनी अशा उपक्रमांमध्ये अधिकाधिक सहभाग घ्यावा, जेणेकरून कोणताही विद्यार्थी आर्थिक अडचणींमुळे शिक्षणापासून वंचित राहणार नाही, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.















