शिक्षक मतदारसंघाची मतमोजणी समन्वयाने पार पाडावी – विभागीय आयुक्त नयना गुंडे
त्यामुळे मतमोजणीला मोठा कालावधी लागणार आहे. त्यामुळे मतमोजणीसाठी नियुक्त अधिकारी-कर्मचारी यांनी शिक्षक मतदारसंघाची मतमोजणी समन्वयाने व्यवस्थित पार पाडावी, असे आवाहन विभागीय आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी नयना गुंडे यांनी केले.
विभागीय आयुक्त कार्यालयात आज विधान परिषदेच्या शिक्षक मतदारसंघाच्या मतमोजणीसाठी नियुक्त अधिकारी, कर्मचारी यांचे प्रशिक्षण पार पडले. यावेळी जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर (वाशिम), प्रविणकुमार देवरे (बुलडाणा), विकास मिना (यवतमाळ), अपर आयुक्त संजय जाधव, सहआयुक्त वासंती माळी, जात पडताळणीचे अध्यक्ष नरेंद्र फुलझेले (बुलडाणा), सोनाप्पा यमगर (यवतमाळ) आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
विभागीय आयुक्त श्रीमती गुंडे यांनी, शिक्षक मतदारसंघाची निवडणूक इतर सार्वत्रिक निवडणुकीपेक्षा वेगळी आहे. यातील मतदान हे पसंतीक्रमानुसार द्यावे लागते. त्यामुळे मतमोजणीवेळी नियुक्त अधिकारी, कर्मचारी यांनी दक्षता बाळगणे गरजेचे आहे. प्रशिक्षणामुळे मतमोजणीच्यावेळी येणाऱ्या समस्या आणि संकल्पना स्पष्ट होण्यास मदत मिळाली आहे. मतमोजणीसाठी नियुक्तांनी याआधीही कार्य पार पाडले आहे. त्यामुळे त्यांना मतमोजणीची कल्पना आहे. मतदान पसंतीक्रमानुसार होत असल्याने पसंतीक्रम पाहावा. तसेच मतपत्रिकेविषयी शंका असल्यास याबाबत सहायक निवडणूक निर्णय अधिकारी निर्णय घेणार आहेत.
मतमोजणीची प्रक्रिया दीर्घ कालावधीसाठी सुरू राहते. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी यासाठी मानसिकदृष्ट्या तयार राहावे. मतमोजणीसाठी नियुक्तांची दि. 26 ऑक्टोबर रोजी राहण्याची व्यवस्था विश्रामगृह आणि प्रबोधिनी येथे करण्यात आली आहे. त्यामुळे मतमोजणीच्या दिवशी वेळेपूर्वी केंद्रावर हजर व्हावे. मतपत्रिकांची हाताळणी व्यवस्थितरित्या करावी लागणार आहे. तसेच प्रतिबंध असल्याने मोबाईल व इतर डिजीटल सयंत्र मतमोजणीच्या ठिकाणी आणू नयेत. अशी सुचनाही विभागीय आयुक्तांनी यावेळी केली.
यावेळी श्रीमती माळी यांनी, मतमोजणीच्या प्रक्रियेविषयी सविस्तर माहिती दिली. तसेच डॉ. पंजाबराव देशमुख विदर्भ प्रशासकीय व विकास प्रशिक्षण प्रबोधिनीचे संचालक श्यामकांत म्हस्के यांनी मार्गदर्शन केले.

