(नंदुरबार) महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रात ‘मधकेंद्र (मधमाशा पालन) योजना’ प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. शेतकरी आणि सर्वसामान्य मधपाळांचे आर्थिक उत्पन्न वाढवून त्यांचे जीवनमान उंचावणे, हा या योजनेचा मुख्य उद्देश जिल्ह्यातील नागरिकांसाठी ही एक सुवर्णसंधी चालून आली आहे, अशी माहिती जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी राजेश गवांदे यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविली आहे.
शेती उत्पादनात 30 ते 40 टक्क्यांनी वाढ
मधमाशा पालनामुळे केवळ मध आणि मेणाची विक्री करून नफा मिळत नाही, तर मधमाश्यांद्वारे होणाऱ्या परागीभवनामुळे शेती पिकांच्या उत्पादनात तब्बल 30 ते 40 टक्क्यांपर्यंत वाढ होते. याशिवाय रॉयल जेली, प्रोपोलिस आणि मधमाशांचे विष यांसारख्या मौल्यवान उपउत्पादनांची विक्री करून अतिरिक्त उत्पन्न मिळवता येते. अतिशय कमी जागा, कमी भांडवल आणि शेतीला पूरक असणारा हा एक उत्तम व्यवसाय आहे.
योजनेचे स्वरूप आणि लाभ
या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना आवश्यक ते प्रशिक्षण, मधमाशा पालन व्यवसायासाठी लागणारे साहित्य, मधपेट्या, मधमाशी वसाहत आणि मधयंत्रांचा पुरवठा केला जातो. या व्यवसायासाठी 50 टक्के रक्कम शासन अनुदान स्वरूपात देणार असून, उर्वरित 50 टक्के रक्कम लाभार्थी हिस्सा (स्वतःची गुंतवणूक) असणार आहे.
निवासी प्रशिक्षणाची मोफत सोय
योजनेच्या प्रसिद्धीसाठी तालुकास्तरावर 50 शेतकरी/मधपाळांसाठी 01 दिवसाचे जनजागृती शिबीर घेण्यात येईल.
• वैयक्तिक मधपाळ: लाभार्थ्याला 10 दिवसांचे निवासी प्रशिक्षण दिले जाईल.
• प्रगतीशील मधपाळ व संस्था सदस्य: महाबळेश्वर येथील मध संचालनालयात 20 दिवसांचे निवासी प्रशिक्षण दिले जाईल. या दोन्ही प्रशिक्षणादरम्यान राहण्याची व जेवणाची सोय मंडळाकडून पूर्णपणे मोफत केली जाईल. 50 टक्के स्व-गुंतवणूक रक्कम कार्यालयाकडे जमा केल्यानंतर हे प्रशिक्षण सुरू होईल.
पात्रतेच्या अटी व आवश्यक कागदपत्रे
• वैयक्तिक मधपाळ: अर्जदार साक्षर व 18 वर्षांपेक्षा जास्त वयाचा असावा (शेती असल्यास प्राधान्य). तसेच मान्यता प्राप्त केंद्रात 10 दिवसाचे प्रशिक्षण पूर्ण करणे अनिवार्य आहे.
• प्रगतीशील मधपाळ: वय 21 वर्षांपेक्षा जास्त, किमान 10 वी उत्तीर्ण आणि स्वतःच्या किंवा कुटुंबाच्या नावे किमान 01 एकर शेतजमीन आवश्यक.
• संस्था: नोंदणीकृत संस्था असावी, किमान 01 एकर शेतजमीन आणि प्रशिक्षण केंद्रासाठी 500 चौ. फुटांची सुयोग्य इमारत असावी.
आवश्यक कागदपत्रे: आधार कार्ड, शैक्षणिक पात्रतेचा दाखला, 7/12 आणि 8-अ चा उतारा (असल्यास), बँक पासबुकची छायांकित प्रत, पासपोर्ट आकाराचे फोटो आणि विहित नमुन्यातील अर्ज.
या योजनेची अंमलबजावणी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, नंदुरबार यांच्याद्वारे केली जात आहे. इच्छुक लाभार्थ्यांनी अर्जासाठी व अधिक माहितीसाठी जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी, महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, दुसरा मजला, रूम नं. 222, नवीन प्रशासकीय इमारत, जिल्हाधिकारी कार्यालय, टोकरतलाव रोड, नंदुरबार. संपर्क क्रमांक: 02564-210053 मोबाईल: 8999349569 (दक्षता चव्हाण – मधुक्षेत्रिक), या पत्त्यावर संपर्क साधावा, असेही ग्रामोद्योग अधिकारी श्री गवांदे यांनी या शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.
















