ग्रामपंचायत मंदाणे येथे ‘सेवा संकल्प’ आणि ‘स्वच्छता ही सेवा’ अभियानाचा नमन गोयल यांच्या हस्ते भव्य शुभारंभ!
(शहादा) राज्यभरात दि. १७ सप्टेंबर ते दि. १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत 'सेवा संकल्प अभियान' तर १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२६ दरम्यान 'स्वच्छता ही सेवा अभियान' राबवले जात आहे. याच पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत मंदाणे येथे या दोन्ही अभियानांची उत्साहात सुरुवात करण्यात आली. दि.17/09/2026 रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी, नमन गोयल (भाप्रसे) यांच्या प्रमुख उपस्थितीत ग्रामपंचायत मंदाणे (ता. शहादा, जि. नंदुरबार) येथे ‘सेवा संकल्प अभियान – २०२६’ आणि ‘स्वच्छता ही सेवा’ अभियानाचा शुभारंभ मोठ्या उत्साहात पार पडला.
अभियानाची प्रमुख उद्दिष्टे आणि उपक्रम:
• शासकीय सेवा जलद व पारदर्शक: नागरिकांना शासकीय सेवा वेळेत उपलब्ध करून देणे आणि प्रलंबित प्रकरणांचा त्वरित निपटारा करणे.
• ‘Whole of Government – Whole of Village’: सर्व शासकीय विभागांच्या समन्वयाने गावाचा सर्वांगीण विकास साधणे.
• शाश्वत उपक्रम: ग्रामपंचायतीसह स्थानिक शाळा, अंगणवाडी, प्राथमिक आरोग्य केंद्र व अन्य शासकीय यंत्रणांच्या माध्यमातून लोकसहभाग वाढवून सेवा व स्वच्छता विषयक विविध उपक्रम राबवणे.
सदर कार्यक्रमावेळी मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, नमन गोयल (भाप्रसे) यांच्या प्रमुख उपस्थितीत उपस्थित ग्रामपंचायतीचे अधिकारी व सन्मा.पदाधिकारी तसेच गट स्तरावरील सर्व क्षेत्रीय अधिकारी व कर्मचारी, ग्रामस्थ यांनी सेवा संकल्प आणि स्वच्छतेची शपथ घेतली. तसेच उपस्थित मान्यवरांच्या हस्ते परिसर पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षारोपण करण्यात आले, विविध योजनांच्या लाभार्थ्यांना वैयक्तिक लाभाचे प्रमाणपत्र व आदेश वितरित करण्यात आले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी, यांनी ग्रामपंचायत कार्यालय, शाळा अंगणवाडी केंद्र व प्राथमिक आरोग्य केंद्र येथे प्रत्यक्ष भेट देऊन ग्रामस्थांना देण्यांत येणा-या सेवा व सुविधांची माहिती घेऊन तत्पर, पारदर्शक व गुणवत्तापुर्ण सेवा शेवटच्या घटकापर्यंत पोहचविण्यासाठी आवश्यक सुचना दिल्या.
मा. मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल यांचे आवाहन:-
“सेवेला कृतीची जोड द्या!” विकसित भारत २०४७ च्या ध्येयाकडे वाटचाल करताना सर्व नागरिकांनी एकत्र येऊन या सेवा संकल्प व शाश्वत स्वच्छतेच्या अभियानात सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन नमन गोयल यांनी केले.
शाळकरी मुलांच्या सर्वांगीण विकासावर बोलताना मुख्य कार्यकारी अधिकारी, नमन गोयल यांनी “मुलांच्या विकासावर घर, कुटुंब, समाज आणि परिसराचा मोठा प्रभाव असतो. त्यामुळे विद्यार्थी दशेत विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास गुणवत्ता वाढ व व्यक्तीमत्व् घडविण्याची जबाबदारी केवळ शिक्षकांची नसून संपूर्ण समाजाची आहे.” त्यासाठी…
• SMC चे सबलीकरण: शाळा व्यवस्थापन समितीच्या (SMC) मासिक बैठका केवळ औपचारिकता न राहता तो शाळा विकासाचा मुख्य मंच बनला पाहिजे.
• महत्त्वाचे मुद्दे: बैठकांमध्ये विद्यार्थ्यांची नियमित उपस्थिती, अध्ययनातील अडचणी, शाळेच्या गरजा व साधनांचा योग्य वापर यावर नियमित चर्चा व्हावी.
• ‘आपली शाळा’ संकल्पना: शिक्षक, पालक, SMC आणि समाज यांनी एकत्र येऊन गावातील शाळेला ‘आपली शाळा’ बनवावे आणि मुलांच्या उज्ज्वल भविष्याची जबाबदारी स्वीकारावी असे आवाहन केले.

विज्ञापित
Follow Us:

