
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून राज्यात नव्याने स्थापन करण्यात आलेल्या ‘परकीय थेट गुंतवणूक, प्रवासी भारतीय व्यवहार आणि आंतरराष्ट्रीय संपर्क’ या विभागाच्या माध्यमातून जिओ मॉल, बीकेसी या ठिकाणी आजपासून सुरु झालेल्या ‘जेम्स अँड ज्वेलरी प्रदर्शनात‘ उपस्थित असलेल्या सुमारे 200 विदेशी प्रतिनिधींसमोर महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा जपत परकीय गुंतवणूक क्षमतेचे प्रभावी सादरीकरण करण्यात आले.
राज्याच्या परकीय थेट गुंतवणूक, प्रवासी भारतीय व्यवहार आणि आंतरराष्ट्रीय संपर्क विभागामार्फत विविध आंतरराष्ट्रीय व्यापारी संघटना आणि उद्योग संस्थांशी सातत्याने संपर्क ठेवून महाराष्ट्रासाठी नव्या गुंतवणूक संधी शोधल्या जात आहेत. याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या माध्यमातून जेम अँड ज्वेलरी एक्स्पोर्ट प्रमोशन कौन्सिल (जीजेईपीसी) मार्फत 11 ते 14 मे 2026 या कालावधीत मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर येथे ‘किंबरली प्रोसेस इंटरसेशनल मिटिंग’ मध्ये महाराष्ट्राचे विशेष प्रदर्शन दालन उभारण्यात आले आहे. महाराष्ट्रातील सांस्कृतिक, कृषी, हस्तकला आणि पारंपरिक उत्पादनांचे जागतिक प्रतिनिधींसमोर सादरीकरण करून त्यांना आंतरराष्ट्रीय निर्यात आणि गुंतवणुकीशी जोडणे हा या दालनाचा मुख्य उद्देश आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून स्थापन करण्यात आलेल्या ‘परकीय थेट गुंतवणूक, प्रवासी भारतीय व्यवहार आणि आंतरराष्ट्रीय संपर्क विभाग’ या सामान्य प्रशासन विभाग अंतर्गत नवीन उपविभागाची स्थापना करण्यात आलेली आहे. डॉ. राजेश गवांदे या विभागाचे सचिव आहेत. देश पातळीवर अशाप्रकारे स्वतंत्र विभाग स्थापन करण्याची ही पहिलीच वेळ असून राज्यामध्ये जास्तीत जास्त परकीय गुंतवणूक आणण्यासाठी व आंतरराष्ट्रीय स्तरावरील संबंध सुधारण्यासाठी हा विशेष प्रयत्न आहे. महाराष्ट्राच्या विविध विभागांमध्ये तसेच विविध भौगोलिक क्षेत्रामध्ये अधिकाधिक परकीय गुंतवणूक आकर्षित करणे, जगभरातील प्रवासी भारतीयांशी समन्वय वाढविणे तसेच राज्याची सांस्कृतिक आणि आर्थिक ताकद जागतिक स्तरावर पोहोचविणे या उद्देशाने विभागामार्फत विविध राज्यस्तरीय, राष्ट्रीय स्तरीय आणि आंतरराष्ट्रीय उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्याचबरोबर राज्याच्या सांस्कृतिक वैभव, पारंपरिक उत्पादने आणि निर्यातक्षम वस्तूंच्या माध्यमातून महाराष्ट्राची ‘सॉफ्ट पॉवर’ जागतिक स्तरावर प्रभावीपणे मांडण्यावर भर देण्यात येत आहे.
या प्रदर्शनामध्ये महाराष्ट्रातील निर्यातक्षम आणि सांस्कृतिकदृष्ट्या वैशिष्ट्यपूर्ण उत्पादनांचे आकर्षक प्रदर्शन करण्यात येत आहे. कोकणातील भौगोलिक मानांकन प्राप्त हापूस आंबा, राज्यातील हातमाग उत्पादने, ग्रामीण महिला बचतगटांची उत्पादने, आदिवासी विकास विभागांतर्गत ‘शबरी’ ब्रँडची उत्पादने तसेच पारंपरिक हस्तकला यांचा समावेश करण्यात आला आहे. आंतरराष्ट्रीय प्रतिनिधींना महाराष्ट्राची ओळख अधिक प्रभावीपणे व्हावी यासाठी पारंपरिक महाराष्ट्रीयन वेशभूषेतील राज्य शासनाच्या प्रतिनिधींची नियुक्ती प्रदर्शन दालनात करण्यात आली आहे.
या उपक्रमात पणन, ग्रामविकास, आदिवासी विकास, वस्त्रोद्योग विभाग आणि हातमाग क्षेत्राशी संबंधित संस्थांच्या सहभागातून महाराष्ट्रातील स्थानिक उत्पादने, पारंपरिक कौशल्य आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला जागतिक बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. जीजेईपीसीमार्फत आंतरराष्ट्रीय प्रतिनिधींना अधिकृत भेटवस्तू म्हणून महाराष्ट्रातील हापूस आंब्याचे वाटपही करण्यात आले. त्यामुळे महाराष्ट्राच्या कृषी आणि निर्यात क्षमतेचे जागतिक स्तरावर प्रभावी ब्रँडिंग होण्यास मदत होणार आहे.
रत्न आणि दागिने उद्योग क्षेत्रात महाराष्ट्राने देशात अग्रस्थान मिळविले असून देशाच्या एकूण रत्न-दागिने निर्यातीपैकी सुमारे 47 टक्के निर्यात महाराष्ट्रातून होत आहे. अत्याधुनिक कटिंग, पॉलिशिंग आणि डिझाईन क्षमतांमुळे महाराष्ट्राने जागतिक बाजारपेठेत स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. या क्षेत्रात 100 टक्के विदेशी थेट गुंतवणुकीला परवानगी देण्यात आली असून विविध मुक्त व्यापार करारांमुळे उद्योगांना व्यापक संधी उपलब्ध होत आहेत.
या उपक्रमातून स्थानिक कौशल्य, पारंपरिक वारसा आणि आधुनिक उद्योग यांची सांगड घालत महाराष्ट्राला जागतिक गुंतवणूक, निर्यात आणि सांस्कृतिक सहकार्याच्या नव्या पर्वाकडे नेण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न अधोरेखित होत असल्याचे प्रतिपादन विभागाचे सचिव डॉ.राजेश गवांदे यांनी या निमित्ताने केले आहे.















