Home नंदुरबार जिल्हा कणकवलीत ‘गावठी आठवडा बाजारा’चा शुभारंभ; ग्रामीण अर्थव्यवस्थेला मिळणार नवी उभारी – मंत्री नितेश राणे

कणकवलीत ‘गावठी आठवडा बाजारा’चा शुभारंभ; ग्रामीण अर्थव्यवस्थेला मिळणार नवी उभारी – मंत्री नितेश राणे

0
कणकवलीत ‘गावठी आठवडा बाजारा’चा शुभारंभ; ग्रामीण अर्थव्यवस्थेला मिळणार नवी उभारी – मंत्री नितेश राणे
‘Rural Weekly Market’ launched in Kankavli; rural economy to get a new boost – Minister Nitesh Rane

सिंधुदुर्गनगरी: ग्रामीण भागातील शेतकरी, महिला बचत गट, कारागीर आणि लघुउद्योजक यांना त्यांच्या उत्पादनांसाठी थेट बाजारपेठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने कणकवली पंचायत समिती आवारात सुरू करण्यात आलेल्या ‘गावठी आठवडा बाजारा’चे उद्घाटन पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. या उपक्रमामुळे स्थानिक उत्पादकांना हक्काची बाजारपेठ मिळणार असून ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवसंजीवनी मिळेल, असा विश्वास पालकमंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केला.यावेळी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शीतल पुंड, पंचायत समिती सभापती हर्षदा वाळके, उपसभापती राजेश सावंत, गटविकास अधिकारी अरुण चव्हाण यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, शेतकरी, महिला बचत गटांच्या प्रतिनिधी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

उद्घाटन प्रसंगी बोलताना पालकमंत्री नितेश राणे म्हणाले, ग्रामीण अर्थकारणावर जिल्ह्याचे दरडोई उत्पन्न अवलंबून असते. या गावठी बाजारपेठेमुळे नागरिकांना स्थानिक स्तरावर दर्जेदार, ताज्या आणि विश्वासार्ह उत्पादनांची उपलब्धता होणार आहे. त्याचबरोबर शेतकरी, महिला बचत गट आणि स्थानिक उद्योजकांना त्यांच्या उत्पादनांच्या विक्रीसाठी थेट व्यासपीठ मिळणार असल्याने ग्रामीण अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळणार आहे. खासदार नारायण राणे यांच्या संकल्पनेतून सुरू झालेला हा उपक्रम ग्रामीण विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. या उपक्रमाचे अनुकरण जिल्ह्यातील इतर पंचायत समित्यांनीही करावे. अशा बाजारपेठांमुळे शेतकरी आणि ग्राहक यांच्यातील थेट संबंध दृढ होतील आणि स्थानिक उत्पादनांना योग्य बाजारभाव मिळण्यास मदत होईल, असेही श्री. राणे म्हणाले.

शुभारंभानंतर पालकमंत्री श्री. राणे यांनी बाजारातील विविध स्टॉलना भेट देत विक्रीसाठी ठेवण्यात आलेल्या भाज्या, फळे, सेंद्रिय शेतीमाल, घरगुती खाद्यपदार्थ आणि स्थानिक उत्पादनांची पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकरी आणि विक्रेत्यांशी संवाद साधून उत्पादनांची माहिती जाणून घेतली. तसेच या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदविल्याबद्दल शेतकरी, महिला बचत गट आणि विक्रेत्यांचे अभिनंदन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here