Home आरोग्य ३० वर्षांवरील नागरिकांसाठी १०० दिवसांचे विशेष आरोग्य अभियान; मधुमेह, रक्तदाब व कर्करोगाची...

३० वर्षांवरील नागरिकांसाठी १०० दिवसांचे विशेष आरोग्य अभियान; मधुमेह, रक्तदाब व कर्करोगाची तपासणी

0
Special 100-day health campaign for citizens over 30; screening for diabetes, blood pressure, and cancer.

आरोग्य भवन येथे ‘३० वर्षांचा पल्ला, तपासणी अन् सल्ला’ या विशेष अभियानाच्या नियोजनाची बैठक सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली.

या अभियानात ३० वर्षांवरील महिला व पुरुषांची मधुमेह, उच्च रक्तदाब तसेच गर्भाशय, स्तन आणि मुखाच्या कर्करोगासाठी तपासणी, निदान व उपचार करण्यात येणार असून हे अभियान १ सप्टेंबर पासून १०० दिवस राबविण्यात येणार आहे. यासाठी ग्रामीण भागातील आशा, एएनएम व एमपीडब्ल्यू यांना विशेष प्रशिक्षण देऊन, त्यांच्या माध्यमातून दररोज ४० ते ४५ घरांतील मधुमेह, उच्च रक्तदाब व कर्करोगाची तपासणी न झालेल्या व्यक्तींची यादी तयार केली जाईल. अभियानांतर्गत होणाऱ्या तपासण्यांचे अहवाल व नोंदी जतन केल्या जाणार असून, अभियानाचे नियमित सनियंत्रण व पर्यवेक्षण करण्यात येईल. अभियानाची प्रगती डॅशबोर्डच्या माध्यमातूनही तपासली जाणार आहे, असेही मंत्री आबिटकर यांनी स्पष्ट केले.

१५ ऑगस्ट रोजी येथे उत्तर प्रदेशच्या धर्तीवर आरोग्यसेवेचा होप हा पायलट प्रकल्प सुरू करण्यात येणार आहे. शासकीय आरोग्य सुविधा देणाऱ्या रुग्णालयांची माहिती नागरिकांना घरबसल्या उपलब्ध व्हावी, या उद्देशाने हा प्रकल्प राबविण्यात येणार असून, टप्प्याटप्प्याने तो संपूर्ण राज्यात विस्तारण्यात येईल, असे मंत्री आबिटकर यांनी सांगितले.

याबैठकीस सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. निपुण विनायक, आयुक्त (आरोग्य सेवा) संजय काटकर, शहरी आरोग्य आयुक्त डॉ. सुनील भोकरे, संचालक डॉ. नितीन आंबाडेकर यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.