नवी दिल्ली : राजधानीतील रसिकांना मराठी चित्रपटांच्या समृद्ध परंपरेचा परिचय करुन देणाऱ्या दिल्ली मराठी चित्रपट महोत्सवाची रविवारी उत्स्फूर्त प्रतिसादात दिमाखदार सांगता झाली. दिल्ली मराठी प्रतिष्ठानतर्फे महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल सेंटर येथे आयोजित तीन दिवसीय महोत्सवाला दिल्लीतील मराठी नागरिकांसह इतर भाषिक रसिकांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. महोत्सवातील विविध चित्रपट आणि उपक्रमांना रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावत मराठी चित्रपटांप्रती असलेली आपली आवड दाखवून दिली.
समारोपप्रसंगी दिल्ली मराठी प्रतिष्ठानचे संस्थापक आणि या महोत्सवाचे प्रमुख आयोजक वैभव डांगे यांनी महोत्सवाच्या यशाबद्दल समाधान व्यक्त केले. या महोत्सवासाठी आलेल्या कलाकार आणि दिग्दर्शकांनी रसिकांशी थेट संवाद साधत चित्रपटांच्या निर्मितीमागील अनुभव, विचार आणि भूमिका मांडल्या. दिल्लीतील मराठी नागरिकांसोबतच इतर भाषिक रसिकांनी दिलेला प्रतिसाद ही महोत्सवाची मोठी जमेची बाजू असून, हा केवळ प्रारंभ आहे. आगामी काळात महोत्सव अधिक व्यापक आणि भव्य स्वरूपात आयोजित केला जाईल, असा निर्धार श्री. डांगे यांनी व्यक्त केला.
तीन दिवसांत ‘देऊळ बंद 2, ‘सत्यशोधक, ‘उत्तर, ‘तुंबाडची मंजुळा, ‘स्थळ, ‘घबाडकुंड, ‘फुलवंती, ‘सामना आणि ‘आशा यांसह विविध दर्जेदार मराठी चित्रपटांचे प्रदर्शन झाले. ‘’परत 41° च्या मागावर, ‘वॉटरमॅन’ आणि ‘ग्लो वॉर्म इन जंगल या लघुपटांनाही रसिकांचा प्रतिसाद मिळाला. सामाजिक वास्तव, मानवी नातेसंबंध, सांस्कृतिक वारसा आणि बदलत्या समाजजीवनाचे विविध पैलू मांडणाऱ्या या कलाकृतींनी रसिकांना विचार करायला भाग पाडले.
चित्रपट प्रदर्शनासोबतच आयोजित संवाद सत्रे या महोत्सवाचे विशेष आकर्षण ठरली.प्रसिद्ध दिग्दर्शक प्रवीण तरडे, ‘सत्यशोधक’ चे दिग्दर्शक निलेश जळमकर, ‘तुंबाडची मंजुळा चे क्रिएटिव्ह प्रोड्युसर गणेश सपट, ‘घबाडकुंडचे कलाकार संदीप पाठक, ‘मामाच्या गोव्याला जाऊ या’ चे कलाकार अभिजित चव्हाण, ‘गांधी टॉक्स’च्या कलाकार उषा नाडकर्णी आणि दिग्दर्शक किशोर बेलेकर यांनी रसिकांशी संवाद साधला. चित्रपट निर्मिती, व्यक्तिरेखा, दिग्दर्शन आणि तांत्रिक बाबींवर कलाकारांनी आपले अनुभव मांडले. रसिकांनीही थेट प्रश्न विचारत संवाद साधल्याने महोत्सवाला अधिक जिवंत स्वरूप प्राप्त झाले.
महोत्सवातील ‘फिल्म मास्टर क्लास’लाही विशेष प्रतिसाद मिळाला. फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे प्रा. डॉ. मिलिंद दामले यांच्या मार्गदर्शनाखाली चित्रपट निर्मिती, दिग्दर्शन आणि चित्रपट रसग्रहणाच्या विविध पैलूंवर मार्गदर्शन करण्यात आले. शंभराहून अधिक तरुण-तरुणींनी यात सहभाग घेतला. नवोदित कलाकार, विद्यार्थी आणि चित्रपट क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या युवकांसाठी हा उपक्रम मार्गदर्शक ठरला. सहभागी विद्यार्थ्यांना ज्येष्ठ सनदी अधिकारी तथा लेखिका सुप्रिया देवस्थळी, दिल्ली मराठी प्रतिष्ठानचे संस्थापक वैभव डांगे, महाराष्ट्र परिचय केंद्राचे संचालक हेमराज बागुल आणि प्रतिष्ठानचे पदाधिकारी विवेक गार्गे, अभिजीत गोडबोले यांच्या हस्ते प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.
या महोत्सवात ‘दादासाहेब फाळके चित्रपट रसास्वाद मंडळाची स्थापना करण्यात आली. नवी दिल्लीतील महाराष्ट्र शासनाच्या निवासी आयुक्त तथा सचिव श्वेता सिंघल यांच्या पुढाकाराने आणि महाराष्ट्र परिचय केंद्राच्या सहकार्याने या मंडळाची स्थापना करण्यात आली आहे. मराठी चित्रपट केवळ मनोरंजन करत नाहीत, तर प्रेक्षकांना विचार करायला भाग पाडतात. महाराष्ट्राची समृद्ध सांस्कृतिक परंपरा आणि मराठी भाषेचा परिचय दिल्लीतील मराठी तसेच इतर भाषिक नागरिकांना करून देणे हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश असल्याची भूमिका श्रीमती सिंघल यांनी या महोत्सवात मांडली.
या मंडळाच्या माध्यमातून दिल्लीमध्ये वर्षभर मराठी चित्रपट प्रदर्शन, चित्रपट रसास्वाद कार्यक्रम, चर्चासत्रे, कलाकार व दिग्दर्शकांशी संवाद आणि कार्यशाळा आयोजित करण्यात येणार आहेत. महाराष्ट्र सदन आणि महाराष्ट्र परिचय केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने दर महिन्याला महाराष्ट्र सदन येथे चित्रपटांचे प्रदर्शन आणि चर्चेचे आयोजन केले जाणार आहे. त्यामुळे राजधानीतील मराठी चित्रपट चळवळीला वर्षभर सातत्यपूर्ण आणि संस्थात्मक व्यासपीठ मिळणार आहे.
महोत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी राज्य शासनाचा सांस्कृतिक कार्य विभाग फिल्म सिटी फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सहकार्य महत्त्वाचे ठरले. महोत्सवासाठी 30 हून अधिक चित्रपटांच्या प्रवेशिका प्राप्त झाल्या होत्या. दर्जेदार कलाकृतींची निवड, कलाकारांशी संवाद आणि विविध उपक्रमांमुळे राजधानीतील रसिकांना मराठी चित्रपटविश्वाची व्यापक ओळख झाली.
महोत्सवाच्या समारोपप्रसंगी पुढील वर्षीचा ‘दिल्ली मराठी चित्रपट महोत्सव 6 ते 8 ऑगस्ट 2027 या कालावधीत आयोजित करण्याची घोषणा करण्यात आली. दरवर्षी ऑगस्ट महिन्यात हा महोत्सव अधिक व्यापक स्वरूपात आयोजित करण्यासोबतच वर्षभर चित्रपट रसास्वादाचे कार्यक्रम घेऊन दिल्लीतील मराठी चित्रपट चळवळीला सातत्य देण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला.
















