बारामतीतील विकासकामांना गती; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडून पाहणी

उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी आज सकाळी बारामती परिसरातील विविध विकासकामांची प्रत्यक्ष पाहणी करून कामांच्या प्रगतीचा आढावा घेतला. बारामती येथील जिल्हा क्रीडा संकुल राज्यातील युवा खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्तरावर झेप घेण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल ठरेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. विकासकामे निर्धारित वेळेत, नियोजनबद्ध पद्धतीने आणि गुणवत्तापूर्णरीत्या पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकारी व यंत्रणांना दिल्या.
बारामतीतील विकासकामांना गती; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडून पाहणी
Development works in Baramati gain momentum; Deputy Chief Minister Sunetra Pawar conducts an inspection.

बारामतीसह संपूर्ण पुणे जिल्ह्यातील खेळाडूंना सराव, प्रशिक्षण आणि स्पर्धांसाठी दर्जेदार व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने हे क्रीडा संकुल महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे सांगून उर्वरित कामे नियोजित वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी केल्या. कामाच्या गुणवत्तेवर विशेष लक्ष देऊन सुविधा दीर्घकाळ टिकतील, याची दक्षता घेण्याचे निर्देशही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. यावेळी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी केलेल्या कु. जानवी वीरकर या युवा खेळाडूचा तसेच कबड्डी प्रशिक्षक दादासो आव्हाड यांचा उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यानंतर उपमुख्यमंत्री श्रीमती पवार यांनी कृषी उत्पन्न बाजार समिती, बारामती येथील रेशीमकोष केंद्राची पाहणी केली. रेशीम कोष उत्पादन, रेशीम उत्पादक शेतकऱ्यांना उपलब्ध असलेल्या सुविधा तसेच केंद्राच्या माध्यमातून सुरू असलेल्या कामकाजाची त्यांनी माहिती घेतली. त्यानंतर कृषी उत्पन्न बाजार समिती, बारामती येथील ॲग्री मॉलच्या बांधकामाची पाहणी करून प्रकल्पाच्या सद्यस्थितीचा आढावा त्यांनी घेतला. जळोची येथील उपबाजारातील मार्केट कमिटीच्या इमारतीच्या बांधकामाचीही त्यांनी पाहणी केली. यावेळी नगराध्यक्ष सचिन सातव, यांच्यासह संबधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.