जिल्हा स्तरीय जलतरण स्पर्धेत ओणी हायस्कूलच्या प्रेरणा आणि गार्गी मोंडे या दोन्ही भगिनी अव्वल
रत्नागिरी येथे जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा क्रीडा कार्यालय आणि रत्नागिरी जलतरण असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा स्तरीय शालेय जलतरण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत राजापूर तालुक्यातील ओणी पंचक्रोशी शिक्षण मंडळ संचलित नूतन विद्या मंदिर, ओणीच्या दोन सख्या बहिणींनी नेत्रदीपक यश संपादन करत शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
शाळेतील इयत्ता १० वीत शिकणाऱ्या प्रेरणा एकनाथ मोंडे हिने १०० मीटर ब्रेस्ट स्ट्रोक, ५० मीटर ब्रेस्ट स्ट्रोक आणि ५० मीटर फ्री स्टाईल अशा तिन्ही प्रकारांत प्रथम क्रमांक पटकावला. तिच्या या सुवर्णकामगिरीमुळे तिची विभागीय जलतरण स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
तसेच, तिची लहान बहीण आणि इयत्ता ८ वीची विद्यार्थिनी गार्गी एकनाथ मोंडे हिनेही आपल्या बहिणीच्या पावलावर पाऊल ठेवत १०० मीटर ब्रेस्ट स्ट्रोक आणि ५० मीटर ब्रेस्ट स्ट्रोक प्रकारात प्रथम क्रमांक मिळवला.
जिल्हा स्तरीय स्पर्धेत ओणी शाळेच्या या दोन्ही कन्यांनी अव्वल स्थान पटकावत घवघवीत यश मिळवले आहे. या दोन्ही खेळाडूंना प्रशिक्षक (कोच) विवेक विलेणकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल मोंडे भगिनींवर शाळा, संस्था आणि संपूर्ण ओणी पंचक्रोशीतून अभिनंदनाचा आणि कौतुकाचा वर्षाव होत आहे.
Follow Us:

