Home महाराष्ट्र पालकमंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय मान्सूनपूर्व आढावा बैठक संपन्न

पालकमंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय मान्सूनपूर्व आढावा बैठक संपन्न

0
District level pre-monsoon review meeting concluded under the chairmanship of Guardian Minister Nitesh Rane

सिंधुदुर्गनगरी: आगामी मान्सून हंगाम, संभाव्य अतिवृष्टी, चक्रीवादळे तसेच ‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने अधिक सतर्क राहून आपत्ती व्यवस्थापनाची प्रभावी तयारी करावी, असे निर्देश पालकमंत्री नितेश राणे यांनी दिले. जिल्हास्तरीय मान्सूनपूर्व तयारी आढावा बैठकीत ते बोलत होते.

या बैठकीला जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजश्री सामंत तसेच संबंधित विभागाचे अधिकारी दूरदृष्य प्रणालीव्दारे उपस्थित होते.

यावेळी विविध विभागांच्या अधिकाऱ्यांकडून मान्सूनपूर्व तयारीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. जिल्ह्यात अतिवृष्टी, पूर, दरड कोसळणे, चक्रीवादळ, वीजपुरवठा खंडित होणे यांसारख्या संभाव्य संकटांचा विचार करून सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, असे पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले.

घाटमाथा परिसरात दरडी कोसळण्याचे प्रमाण अधिक असल्याने त्या ठिकाणी विशेष उपाययोजना राबविण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. विशेषतः घाट रस्त्यांवर सुरक्षेच्या दृष्टीने संरक्षक जाळ्या उभाराव्यात तसेच पावसाळ्यात धोका निर्माण करणारी झाडे पूर्वतयारी म्हणून हटवावीत, असे निर्देश त्यांनी संबंधित विभागांना दिले.

पूरप्रवण गावांमध्ये अधिक दक्षता घेण्याची आवश्यकता व्यक्त करताना पालकमंत्री म्हणाले की, बचावकार्य जलद आणि प्रभावी होण्यासाठी बोटींची संख्या वाढविण्यात यावी. आपत्तीच्या काळात प्रशासनाने केलेल्या तयारीची प्रत्यक्ष चाचणी घेण्यासाठी मॉक ड्रिल आयोजित कराव्यात. तसेच आपत्कालीन परिस्थितीत उपयोगी पडणारे महत्त्वाचे संपर्क क्रमांक नागरिकांपर्यंत व्यापक प्रमाणात पोहोचवावेत. आरोग्य विभागाने पावसाळ्यात उद्भवणाऱ्या संभाव्य साथीच्या आजारांच्या पार्श्वभूमीवर सज्ज राहण्याच्या सूचना देण्यात आल्या. औषधसाठा, वैद्यकीय पथके आणि आरोग्य सुविधा तत्पर ठेवण्याचे निर्देशही यावेळी देण्यात आले. महावितरण विभागाने वादळी पावसाच्या काळात वीजपुरवठा खंडित होणार नाही यासाठी आवश्यक ती प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, असे सांगताना पालकमंत्र्यांनी नागरिकांना कोणतीही गैरसोय होणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश दिले.

आंबोलीसह जिल्ह्यातील पर्यटनस्थळांवर मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असल्याने त्यांच्यासाठी विशेष जनजागृती मोहीम राबवावी, असेही त्यांनी सांगितले. धोकादायक ठिकाणी पर्यटक जाणार नाहीत यासाठी स्थानिक प्रशासन, पोलीस आणि पर्यटन विभागाने समन्वयाने काम करण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच पूरस्थिती टाळण्यासाठी जिल्ह्यातील नद्यांमधील गाळ काढण्याच्या कामांना गती देण्याच्या सूचनाही पालकमंत्र्यांनी दिल्या. मान्सून काळात कोणतीही जीवित वा वित्तहानी होऊ नये यासाठी सर्व विभागांनी जबाबदारीने आणि सतर्कतेने काम करावे, असे आवाहन त्यांनी बैठकीच्या शेवटी केले.