खरेदी केंद्रांवर सर्व सुविधा उपलब्ध करून धान्य साठवणुकीचे काटेकोर नियोजन करा – मंत्री जयकुमार रावल

मुंबई : केंद्र शासनाच्या हमीभाव खरेदी योजनेअंतर्गत खरीप हंगाम २०२६-२७ मध्ये सोयाबीन, मूग, उडीद व तूर खरेदीसाठी केंद्रांवर शेतकऱ्यांना आवश्यक सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून द्याव्यात. तसेच खरेदी केलेल्या शेतमालाच्या साठवणुकीचे काटेकोर नियोजन करावे, असे निर्देश पणन मंत्री जयकुमार रावल यांनी दिले.
खरेदी केंद्रांवर सर्व सुविधा उपलब्ध करून धान्य साठवणुकीचे काटेकोर नियोजन करा – मंत्री जयकुमार रावल
ensure-all-facilities-at-procurement-centres-and-plan-grain-storage-strictly-minister-jaykumar-rawal

पणन मंत्री जयकुमार रावल यांच्या अध्यक्षतेखाली खरीप हंगामातील हमीभाव खरेदीच्या पूर्वनियोजनाबाबत बैठक झाली. खरीप हंगाम २०२६-२७ साठी सोयाबीनच्या हमीभावात ३८०, तुरीच्या हमीभावात ४५०, उडदाच्या हमीभावात ४०० रुपयांची वाढ झाल्याची माहिती यावेळी देण्यात आली. या बैठकीस प्रधान सचिव प्रवीण दराडे, महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक कौस्तुभ दिवेगावकर, मार्कफेडचे कार्यकारी संचालक अशोक करंजकर, महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाचे व्यवस्थापकीय संचालक संजय कदम, सहसचिव विजय लहाने, कृषी विभागाचे उपसचिव संतोष कराड, नाफेड आणि एनसीसीएफच्या अधिकारी आदी उपस्थित होते.

खरेदी करण्यात येणाऱ्या कडधान्ये व तेलबियांच्या साठवणुकीसाठी वखार महामंडळाच्या स्वमालकीच्या १६८ वखार केंद्रांबरोबरच आवश्यकतेनुसार भाडेतत्वावरील गोदामांचा वापर करण्यात येणार आहे. सद्यस्थितीत स्वमालकीच्या व भाडेतत्वावरील गोदामांमध्ये ८.१२ लाख मे. टन रिक्त साठवणूक जागा उपलब्ध आहे. खरीप हंगामासाठी खासगी गोदामांचे नियोजन करून आणखी ७.१६ लाख मे. टन आंतरिक क्षमता उपलब्ध होणार असून, एकूण १५.२८ लाख मे. टन साठवणूक जागा उपलब्ध होईल.

सर्व खरेदी केंद्रांवर शेतकऱ्यांसाठी बैठक व्यवस्था, पिण्याचे पाणी आणि स्वच्छतागृह या मूलभूत सुविधा उपलब्ध कराव्यात. किंमत समर्थन योजनेच्या मार्गदर्शक सूचनांनुसार बारदाना, वाहतूक आणि गोदामांची व्यवस्था करावी. तसेच संबंधित राज्यस्तरीय नोडल संस्थांच्या सर्व खरेदी केंद्रांवर क्यूआर कोड टॅगिंगची व्यवस्था करावी, असे निर्देश मंत्री रावल यांनी दिले.

नाफेडमार्फत २२ जिल्ह्यांत, तर एनसीसीएफमार्फत सहा जिल्ह्यांत खरेदी प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघ, मुंबई; विदर्भ सहकारी पणन महासंघ, नागपूर आणि महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ, पुणे या राज्यस्तरीय नोडल संस्था खरेदी प्रक्रियेत सहभागी होतील. राज्य शासनाने निश्चित केलेल्या यादीनुसार खरेदी केंद्रे कार्यान्वित करण्यात येणार आहेत. हमीभाव योजनेची माहिती अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रत्येक खरेदी केंद्रावर माहिती फलक लावण्याबरोबरच दूरचित्रवाणी, आकाशवाणी, प्रसिद्धीपत्रके आणि फलकांच्या माध्यमातून व्यापक प्रसिद्धी देण्यात येणार आहे. नोंदणी व खरेदी यंत्रणा सुरळीत चालण्यासाठी आवश्यक तांत्रिक मनुष्यबळ उपलब्ध करण्याचेही नियोजन करण्यात आले आहे.

खरीप हंगाम २०२६-२७ साठी गतवर्षाच्या तुलनेत सोयाबीनच्या हमीभावात ३८० रुपयांची वाढ झाली असून, तो ५ हजार ३२८ रुपयांवरून ५ हजार ७०८ रुपये प्रति क्विंटल झाला आहे.उडदाचा हमीभाव ४०० रुपयांनी वाढून ८ हजार २०० रुपये, तर तुरीचा हमीभाव ४५० रुपयांनी वाढून ८ हजार ४५० रुपये प्रति क्विंटल झाला असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

जाहिरात
Dev-Mogra-Nandurbar-Ad-300x250
Follow Us: