जागतिक रोजगाराच्या संधींसाठी ‘जीएसएमएआय’सोबत सामंजस्य करार करणारे महाराष्ट्र पहिले राज्य – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
ग्लोबल स्किल्स मोबिलिटी असोसिएशन ऑफ इंडिया या संस्थेच्या माध्यमातून कौशल्य प्रशिक्षण, आंतरराष्ट्रीय रोजगाराच्या संधी, परदेशी भाषांचे ज्ञान आणि जागतिक कौशल्य यांच्यात समन्वय साधण्यास मदत होईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
नवी दिल्लीतील आयटीसी मौर्या येथे जागतिक मनुष्यबळ गतिशीलतेमध्ये भारताची भूमिका अधिक मजबूत करण्यासाठी, १७ संस्थापक संस्था, शासकीय प्रतिनिधी, राजनैतिक दूतावास, राज्य सरकारे आणि उद्योगपतींना एकत्र आणणाऱ्या ‘ग्लोबल स्किल्स मोबिलिटी असोसिएशन ऑफ इंडिया’ (जीएसएमएआय)ची १२ ऑक्टोबर रोजी औपचारिक स्थापना झाली.
यावेळी परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी, खासदार तथा संसदेच्या कामगार, वस्त्रोद्योग आणि कौशल्य विकासविषयक स्थायी समितीचे अध्यक्ष शशांक मणी, डेन्मार्कचे भारतातील राजदूत रास्मस अबिल्डगार्ड क्रिस्टेन्सन, जर्मनीचे उपराजदूत जॉर्ज एन्झवायलर, इटलीच्या दूतावासाच्या उपप्रमुख ऑरोरा रुसी, ओडिशा शासनाचे सचिव भूपेंद्र सिंह पूनिया, टीमलीज डिजिटलच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नीती शर्मा, क्वेस कॉर्पचे समूह मुख्य कार्यकारी अधिकारी लोहित भाटिया, बॉर्डरप्लसचे सहसंस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी मयंक कुमार, ‘जीएसएमएआय’चे संस्थापक अध्यक्ष अजय खन्ना, मॅजिक बिलियनचे सहसंस्थापक बसब बॅनर्जी, तसेच गतीह फाउंडेशनचे पदाधिकारी, महाराष्ट्र शासनाच्या अपर मुख्य सचिव मनीषा वर्मा आणि विविध देशांचे राजनैतिक प्रतिनिधी उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्रातील युवकांना त्यांच्या कौशल्यांच्या बळावर परदेशात उत्कृष्ट रोजगाराच्या संधी मिळाव्यात. महाराष्ट्रातील अगदी दुर्गम भागातील तरुण-तरुणींना जगातील कोणत्याही देशात करिअर घडविण्याचा आत्मविश्वास मिळावा, यासाठी आवश्यक कौशल्ये, आर्थिक सहाय्य आणि संस्थात्मक पाठबळ उपलब्ध झाले पाहिजे. जागतिक रोजगाराच्या संधी केवळ काही मोजक्या लोकांपुरत्या मर्यादित न राहता राज्यातील सर्वसामान्य युवकांपर्यंत पोहोचाव्यात, यासाठी महाराष्ट्र शासन कटिबद्ध आहे.

