Home आरोग्य सर्वसामान्य गरीब नागरिकांना आता वैद्यकीय उपचाराची चिंता नाही

सर्वसामान्य गरीब नागरिकांना आता वैद्यकीय उपचाराची चिंता नाही

1
Ordinary, poor citizens no longer have to worry about medical treatment.

वर्धा : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून केंद्र शासन आयुष्मान भारत जनआरोग्य योजना तर राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजना राबविण्यात येत आहे, पुर्वी वैद्यकीय उपचार, शस्त्रक्रियांसाठी आपल्याजवळ किती पैसे आहेत, याचा विचार करावा लागत होता. आता सर्वसामान्य नागरिकांची उपचाराची चिंता जन आरोग्य योजनांमुळे मिटली आहे, असे प्रतिपादन ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांनी केले.

आरोग्य अमृत महोत्सवांतर्गत हिंगणघाट येथे आयोजित महाआरोग्य शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी ग्रामविकास मंत्री श्री.गोरे बोलत होते. कार्यक्रमास पालकमंत्री डॉ.पंकज भोयर, आरोग्य राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर, आमदार समीर कुणावर, नगराध्यक्ष डॉ.नयना तुळसकर, जिल्हाधिकारी वान्मथी सी, मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण, जिल्हा पोलिस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, आरोग्य उपसंचालक डॉ.शशिकांत शंभरकर, जिल्हा नियोजन समिती सदस्य संजय गाते, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुमंत वाघ, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.स्वप्नील बेले उपस्थित होते.

पालकमंत्री डॉ.पंकज भोयर यांच्या संकल्पनेतून गेल्यावर्षी वर्धा जिल्ह्यात मोतीबिंदू विरहित अभियान राबविण्यात आले. पालकमंत्र्यांचा हा स्तुत्य उपक्रम राज्यभर राबविण्यात आला आणि एक लाख नागरिकांची मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आली. मागील वर्षीच्या सेवाभावी वृत्तीतून यावर्षी देखील सर्वसामान्य नागरिकांना चांगल्या आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राबविण्यात येत असलेला आरोग्य अमृत महोत्सव अत्यंत कौतुकास्पद आहे. मुख्यमंत्र्यांनी माझा वाढदिवस सामाजिक उपक्रमाचे साजरा करावा, असे आवाहन केले होते. वर्धा जिल्ह्यात खऱ्या अर्थाने सामाजिक बांधिलकी म्हणून काम केले जात असल्याचे श्री.गोरे यांनी सांगितले.

वर्धा जिल्ह्यात आयोजित होणाऱ्या या आरोग्य शिबिरात केवळ सामान्य तपासण्याच नाही तर हृदयरोग, कर्करोगाची तपासणी व त्यासाठी तज्ज्ञ डॉक्टर सुद्धा उपलब्ध करून दिले. शहरी भागातील रुग्णांना ज्या सुविधा उपलब्ध होतात, तशाच सुविधा आता ग्रामीण भागातही उपलब्ध होत आहे. ज्या रुग्णांना कुठुनही उपचारांसाठी मदत होऊ शकत नाही, अशा रुग्णांसाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी योजनेतून उपचार दिले जातात. सहायता निधीतून स्थानिक स्तरावरच आर्थिक मदत उपलब्ध होण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात कक्ष स्थापन करण्यात आला असल्याचेही श्री.गोरे म्हणाले.

सर्वसामान्यांच्या सुविधेसाठी आरोग्य अमृत महोत्सव : डॉ.पंकज भोयर

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त गेल्यावर्षी आपण जिल्ह्यात मोतीबिंदू विरहित वर्धा जिल्हा अभियान राबविले. अभियानांतर्गत ६६०८ रुग्णांची विनामूल्य मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आली. अलीकडे विविध प्रकारचे आजार बळावत आहे. उत्तम आरोग्य हीच सर्वात मोठी संपत्ती आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांना स्थानिक स्तरावरच चांगल्या आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी यावर्षी आपण आरोग्य अमृत महोत्सव राबवित आहे. शिबिरात रुग्णांना विविध आजारांचे निदान झाल्यास पुढील उपचार देखील उपलब्ध करुन देऊ, असे पालकमंत्री डॉ.पंकज भोयर यांनी सांगितले.

पालकमंत्र्यांची संकल्पना आम्ही राज्यभर राबविली : मेघना साकोरे-बोर्डीकर

पालकमंत्री डॉ.पंकज भोयर यांनी गेल्यावर्षी वर्धा जिल्ह्यात मोतीबिंदू विरहित वर्धा जिल्हा हा उपक्रम राबविला. हा अतिशय चांगला आणि उपयुक्त उपक्रम असल्याने आम्ही तो राज्यभर राबवला आणि यातून एक लाख नागरिकांच्या मोतीबिंदू शस्त्रक्रिया केल्या. शेवटच्या घटकातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत आरोग्य सुविधा पोहोचली पाहिजे, याच भावनेतून ‘माझे गाव आरोग्य संपन्न गाव’ हे अभियान राबविण्यात येत आहे. आमदार समीर कुणावर यांच्या पुढाकाराने हिंगणघाट येथे ४०० खाटांचे रुग्णालय होत आहे. तालुकास्तरावर ४०० खाटांचे रुग्णालय असलेले पाचच तालुके आहेत, हिंगणघाट सहावा तालुका असल्याचे आरोग्य राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण यांनी केले. पालकमंत्र्यांच्या संकल्पनेतून गेल्यावर्षी मोतीबिंदू विरहित वर्धा अभियान राबविण्यात आले. यावर्षी आरोग्य अमृत महोत्सवांतर्गत चार ठिकाणी महाआरोग्य शिबिर घेण्यात येत असल्याचे श्री.सोमण म्हणाले. सुरुवातीला दीप प्रज्वलित करून शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर आरोग्य तपासणीसाठी लावण्यात आलेल्या दालनांना भेट व पाहणी मान्यवरांनी केली. शिबिरासाठी हिंगणघाटसह समुद्रपूर तालुका व सिंदी रेल्वे परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आरोग्य तपासणीचा लाभ घेतला. यावेळी मान्यवरांच्या हस्ते आयुष्मान कार्ड व चष्म्यांचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमास हिंगणघाट विधानसभा मतदारसंघातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.