वर्धा : अलीकडे सहकारी संस्थांकडे शेतकऱ्यांचा पाहण्याचा दृष्टीकोण बदलत चालला आहे. अशा स्थितीत विदर्भातील सहकार चळवळीला पुढे नेण्याचे काम हिंगणघाट बाजार समिती करत आहे. या समितीच्यावतीने शेतकऱ्यासाठी विविध योजना व सामाजिक उपक्रम राबवून शेतकरी हिताचे काम केले जात आहे. हिंगणघाट समितीचा आदर्श इतर बाजार समित्यांनी घ्यावा, असे प्रतिपादन ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांनी केले.
हिंगणघाट कृषि उत्पन्न बाजार समितीच्यावतीने लिलाव शेडचे भूमीपूजन, विविध योजनेंतर्गत बैल मृत्यु व आगग्रस्त शेतकरी कुटूंबांना धनादेश वितरण, लॅपटॉप वितरण, जिल्हा परिषद शाळांना सिलींग फॅन वितरण तसेच डिजीटल इंटरॲक्टीव्ह पॅनलचे वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी श्री.गोरे बोलत होते. कार्यक्रमाला पालकमंत्री डॉ.पंकज भोयर, आमदार समीर कुणावार, हिंगणघाट कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती ॲड.सुधीर कोठारी, माजी आमदार राजु तिमांडे, मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक प्रविण देशमुख, वर्धा समितीचे अध्यक्ष अमित गावंडे, आर्वीचे संदीप काळे, समुद्रपूरचे हिम्मत चतुर, सिंदी रेल्वेचे केशरीचंद खंगारे, आष्टीचे राजेंद्र खवशी, हिंगणघाट बाजार समितीचे उपसभापती हरीष वडतकर आदी उपस्थित होते.
पश्चिम महाराष्ट्रातील सहकार चळवळ जोमाने वाढल्यामुळे तेथील सहकार क्षेत्राचा मोठा विकास झाला आहे. विदर्भातील चळवळ नावापुरती राहिली असतांना हिंगणघाट बाजार समितीने शेतकऱ्यांसाठी विविध उपक्रम राबविण्यासोबतच समितीचा वार्षिक नफा मिळविण्यात विदर्भातच नव्हे तर राज्यात स्थान मिळविले आहे. समितीची ही कामगिरी कौतुकास्पद आहे. शेतकऱ्यांना त्यांचा शेतीमाला खुल्या बाजारपेठेत नेण्यास राज्य शासनाने अधिकार दिला असतांना सुध्दा हिंगणघाट बाजार समितीवर विश्वास ठेवून बाजार समितीत शेतकरी शेतमाल विक्रीस आणतात, ही कौतुकाची बाब आहे. राज्य शासनाने शेतकऱ्यांचे वीजबिल माफ करून पुढील पाच वर्ष शून्य बिल करण्याच्या निर्णयासोबतच शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांपर्यत कर्जमाफी केली असल्याचे पुढे बोलतांना जयकुमार गोरे म्हणाले.
सहकार क्षेत्राच्या विकासासाठी केंद्रात स्वतंत्र सहकार विभाग : डॉ.पंकज भोयर
मागील काही वर्षांपासून हिंगणघाट बाजार समितीच्यावतीने शेतकऱ्यांसाठी सामाजिक हिताच्या विविध योजना व उपक्रम राबविले जात आहे. हे कार्य कौतुकास्पद आहे. पश्चिम महाराष्ट्रात सहकाराचे मोठे जाळे आहे. तेथील सहकारी संस्थाचा विकास मोठ्या प्रमाणात होत आहे. पंरतू विदर्भ यामध्ये मागे आहे. केंद्र शासनाने सहकाराचे महत्व ओळखून स्वतंत्र सहकार विभागाची निर्मिती केली. सहकारी संस्थाचे बळीकटीकरण करण्यासाठी विविध योजना राबविण्याचा निर्णय घेऊन या क्षेत्राला नवसंजीवनी देण्याचे काम हाती घेतले आहे. हिंगणघाट बाजार समितीने शेतकऱ्यांच्या मालासाठी गोदामाची निर्मिती केली. सवलतीच्या दरात माल गोदामात ठेवण्याची सुविधा दिली. समितीच्यावतीने नव्याने कोल्ड स्टोरेजची उभारणी करण्यात येत असून यासाठी निधी उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे पालकमंत्री डॉ.पंकज भोयर म्हणाले.
समुद्रपुर व हिंगणघाट बाजार समितीत शेतकरी भवनसाठी निधी मंजूर : आ.समिर कुणावार
हिंगणघाट बाजार समिती ही जिल्ह्यातच नव्हे राज्यात ख्याती प्राप्त आहे. विदर्भात कापसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतल्या जात असतांना जिल्ह्यातील नव्हे तर लगतच्या जिल्ह्यातील सुध्दा शेतकरी आपला कापूस विक्रीसाठी हिंगणघाट येथे आणतात. कृषि उत्पन्न बाजार समितीच्या विकासासाठी सदैव प्रयत्नरत राहू. समुद्रपूर व हिंणघाट बाजार समितीमध्ये शेतकरी भवन निर्माण करण्यासाठी राज्य शासनाकडून प्रती शेतकरी भवन 1 कोटी 25 लक्ष रुपये मंजूर करण्यात आले असल्याचे यावेळी आमदार समीर कुणावार यांनी सांगितले.
यावेळी ॲड सुधीर कोठारी यांनी आपल्या प्रास्ताविकात हिंगणघाट कृषि उत्पन्न बाजार समितीच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या विविध योजना व उपक्रमाची माहिती दिली. यावेळी मान्यवरांच्याहस्ते शेतकरी पाल्यांना लॅपटॉप तसेच विविध साहित्याचे वितरण करण्यात आले. तत्पुर्वी ग्रामविकास मंत्री, पालकमंत्री, आमदार व इतर मान्यवरांच्याहस्ते बाजार समितीच्या लिलाव शेडचे कुदळ मारुन भूमीपूजन करण्यात आले. कार्यक्रमाला, हिंगणघाट बाजार समिती, समुद्रपूर बाजार समितीचे संचालक, तसेच शेतकरी, नागरिक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.
















