मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून वाशिम जिल्ह्यातील दुष्काळसदृश परिस्थितीची पाहणी

वाशिम: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज वाशिम जिल्ह्यातील म्हसला, ता. कारंजा, मोहगव्हाण, ता. मंगरुळपीर आणि जऊळका, ता. मालेगाव येथील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पीक-पाणी परिस्थितीची पाहणी केली. शेतकऱ्यांना भरपाई देण्याच्या घोषणेचा पुनरुच्चार करून मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना दिलासा दिला जाईल, अशी ग्वाही दिली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून वाशिम जिल्ह्यातील दुष्काळसदृश परिस्थितीची पाहणी
fadnavis-drought-tour-maharashtra

दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पश्चिम विदर्भातील म्हणजे अमरावती विभागातील पीक-पाणी परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आज सकाळी अमरावती विमानतळ येथे शासकीय विमानाने आगमन झाले. तेथून ते मोटारीने वाशिम जिल्ह्यातील म्हसला, ता. कारंजा येथील शेतकरी देविदास किशन काळे यांच्या शेतात जाऊन शेतातील नुकसानग्रस्त सोयाबीन व तूर पिकाची पाहणी करत शेतकऱ्यांशी संवाद साधला.

विज्ञापित

मोहगव्हाण, ता. मंगरुळपीर येथील शेतकरी अनिल भगरे, तसेच अब्दुल नईम शेख रहीम यांच्या शेतातील नुकसानाची पाहणी त्यांनी केली. यावेळी त्यांनी शेतकरी बांधवांशी संवाद साधून त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. ते म्हणाले, कमी पर्जन्यमानामुळे सोयाबीन, तूर आदी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांवर हे मोठे संकट आहे. तथापि, शेतकरी बांधवांनी खचून जाऊ नये. शासन शेतकऱ्यांसोबत आहे. त्यांना जास्तीत जास्त मदत करण्यात येईल. यासंबंधीची अधिसूचनाही लवकरच प्रसिद्ध करण्यात येईल.

        जऊळका, ता. मालेगाव येथील शेतकरी संतोष सखाराम डुंबळे यांच्या शेतीच्या बांधावर जाऊन दुष्काळसदृश परिस्थितीची पाहणी केली. उपस्थित शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी शेतकरी संतोष यांच्या आई शकुंतलाबाई यांनीही दुष्काळी परिस्थितीची कैफियत मांडली.

या दौऱ्यात परिसरातील पीक-पाणी परिस्थितीची सविस्तर माहिती घेऊन मुख्यमंत्र्यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने नुकसानभरपाई देण्याच्या आपल्या घोषणेचा पुनरुच्चार केला. अत्यल्प पर्जन्यमानामुळे आसमानी संकटात सापडलेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा दिला जाईल. संकटाच्या काळात शासन शेतकऱ्यांसोबत आहे. त्यांनी कोणतीही चिंता करू नये. झालेल्या नुकसानीचा अंदाज घेऊन शासनाकडून आवश्यक मदत प्राधान्याने आणि लवकरात लवकर दिली जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

        आगामी काळात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होऊ नये म्हणून आवश्यक नियोजन करण्यात येईल. त्याचप्रमाणे चारा उपलब्धतेसाठीही दक्षता घेतली जाईल. शेतकऱ्यांना शासनाची मदत थेटपणे मिळण्यासाठी लवकरच कार्यवाही सुरू होईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

या दौऱ्यात खासदार संजय देशमुख, खासदार अनुप धोत्रे, आमदार बाबुसिंग महाराज, आमदार सई डहाके, आमदार श्याम खोडे, आमदार रणधीर सावरकर, आमदार भावना गवळी, जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर, मुख्य कार्यकारी अधिकारी अर्पित चव्हाण यांच्यासह प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी, लोकप्रतिनिधी आणि संबंधित विभागाचे अधिकारी तसेच शेतकरीबांधव उपस्थित होते.

विज्ञापित
जाहिरात
Dev-Mogra-Nandurbar-Ad-300x250
Follow Us: